पालिकेच्या फतव्यामुळे शाळेत हेलपाटे

पालिका शाळांमधील मुख्याध्यापक आणि संगीत, चित्रकला, हस्तकला, शारीरिक शिक्षण आदी विशेष शिक्षकांना सध्या ब्रिटिश कौन्सिलकडून इंग्रजी भाषेचे धडे देण्यात येत आहेत. मात्र या प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी मुख्याध्यापक आणि विशेष शिक्षकांना आपल्या शाळेत संगणकीय हजेरी लावावी लागत आहे. इतकेच नव्हे तर प्रशिक्षण उरकल्यानंतर पुन्हा शाळेत जाऊन घरी जात असल्याची नोंद संगणकीय हजेरीपटावर करावी लागत आहे.

पालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी पालिका शाळांमधील मुख्याध्यापकांसह सर्वच शिक्षकांना ब्रिटिश कौन्सिलमार्फत इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. भायखळा येथील सावित्रीबाई फुले मनपा शाळा, बोरिवली येथील सोडावाला लेन मनपा शाळा, गोवंडी येथील वैभवनगर मनपा शाळा आणि घाटकोपर येथील पंतनगर मनपा शाळा या चार शाळांमध्ये सकाळी ७.१० ते दुपारी १.१० या वेळेत मुख्याध्यापक आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम नोव्हेंबपर्यंत चालणार आहे. आतापर्यंत निर्वेधपणे प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू होता. मात्र पालिका प्रशासनाने लेटलतिफांना वेसण घालण्यासाठी पालिकेची कार्यालये, रुग्णालय, शाळा आदी ठिकाणी संगणकीय हजेरीपट संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली आणि गोंधळाला सुरुवात झाली.

प्रशिक्षण स्थळ असलेल्या चारही शाळांमध्ये संगणकीय हजेरीपटाची व्यवस्था आहे की नाही याची प्रशिक्षणार्थी मुख्याध्यापक व विशेष शिक्षकांना कल्पनाच नाही. त्यामुळे मुख्याध्यापक आणि विशेष शिक्षकांना प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी आपल्या शाळेत येऊन संगणकीय हजेरीपटावर उपस्थिती नोंदवावी लागत आहे. प्रशिक्षण आटोपल्यानंतर पुन्हा त्यांना आपली शाळा गाठून संगणकीय हजेरीपटावर घरी जात असल्याची नोंद करावी लागत आहे. अनेक शिक्षक विरार, मुलुंडच्या पल्याड राहतात. प्रशिक्षणासाठी त्यांना भल्या पहाटेच घर सोडावे लागत आहे. तर दुपारच्या अधिवेशनात शिक्षकांना भल्या पहाटे द्राविडी प्राणायाम करून प्रशिक्षण आटोपून शाळेत संध्याकाळपर्यंत थांबावे लागत आहे.

संगणकीय हजेरीपटाचा घोळ निस्तरण्यासाठी ६, ७ आणि ८ मार्च रोजी अनुक्रमे शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील सभागृह, विलेपार्ले येथील दीनानाथ नाटय़गृह आणि मुंबई सेंट्रल येथील नायर दंत रुग्णालयाच्या सभागृहात येथे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांनंतर हा प्रश्न निकालात निघेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.