महापालिकेचे नियोजन सुरू

मुंबई : अंथरुणाला खिळलेल्या किंवा आजारपणातून घराबाहेर पडू न शकणाऱ्या सुमारे  चार हजार व्यक्तींची यादी लसीकरणासाठी पालिकेकडे आली असून या व्यक्तींची पडताळणी के ल्यावरच घरी जाऊन त्यांचे लसीकरण केले जाणार आहे.

घरोघरी लसीकरण करण्याबाबत केंद्रापासून ते अगदी राज्यांपर्यंत अनेक महिने प्रलंबित असलेला निर्णय अखेर मुंबईपासून मार्गी लागणार आहे. १ ऑगस्टपासून या व्यक्तींचे लसीकरण मुंबईत सुरू करण्यात येणार आहे.

या व्यक्तींच्या लसीकरणाचे नियोजन करण्याची तयारी पालिकेने सुरू केली असून पालिकेच्या प्रत्येक विभागामधून आलेल्या माहितीनुसार सुमारे चार हजार नागरिकांची यादी आलेली आहे. परंतु यात खरेच किती जणांना घराबाहेर पडणे शक्य होणार नाही याची पडताळणी केली जाणार आहे. यासाठी विभागीय नियंत्रण कक्षाची मदत घेतली जाईल. विभाग स्तरावरही प्रत्यक्ष त्या व्यक्तीची माहिती घेतली जाईल, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

आलेल्या यादीमध्ये अस्थिभंग झाल्याने प्लास्टर केलल्या व्यक्तीनेही घरी लसीकरणासाठी येण्यासाठी नाव नोंदविल्याचे आढळले आहे. अशा व्यक्तींना आता नाही, परंतु काही दिवसांनी येऊन लस घेणे शक्य आहे. घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची प्रक्रिया मोठी आहे. घरोघरी लसीकरणासाठी खास गाडी, लस देण्यासाठी आणि दुष्परिणाम झाले तर तातडीने उपचार देण्यासाठी डॉक्टरांपासून आरोग्य कर्मचारी पाठविले जाणार आहेत. शिवाय लस दिल्यानंतर किमान अर्धा तास तिथे थांबणे अपेक्षित आहे. तेव्हा एका व्यक्तीसाठी स्वतंत्रपणे ही सुविधा उपलब्ध केल्यानंतर तिचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. त्यामुळे घरोघरी लसीकरण कोणाचे केले जावे याचे निकषही लवकरच जाहीर केले जातील, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

नियमावली आणि सूचना

यादीमध्ये अशा काही व्यक्ती आढळल्यास ज्यांना खूप अंतर नाही पण अगदी घराजवळच्या केंद्रामध्ये जाऊन लस घेणे शक्य आहे. या व्यक्तींसाठी तशा सुविधाही दिल्या जातील, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पालिकेकडून लवकरच याबाबतची नियमावली आणि सूचना जाहीर केल्या जातील, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.