नागरिकांच्या आक्षेपांनंतर पालिकेचा निर्णय; शेकडो हरकतींवर प्रत्यक्ष पाहणीनंतर निर्णय

महापालिकेने फेरीवाल्यांकरिता आखलेल्या फेरीवाला क्षेत्राच्या ठिकाणांबाबत नागरिकांकडून तब्बल १७ हजार सूचना व हरकती आल्या असून त्यापैकी काही आक्षेप प्रशासनाने आधीच मान्य केले आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांसाठीच्या ८५ हजार जागांमध्ये तीन ते चार हजारांनी घट होणार आहे. याखेरीज नागरिकांकडून आलेल्या हरकती व सूचनांबाबत पालिका अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून खातरजमा करणार आहेत.

महापालिकेने शहरभरातील एक हजाराहून अधिक रस्त्यांवरील चार बाय चार फुटांच्या ८५ हजार ८९१ जागा फेरीवाल्यांसाठी आखल्या. या जागांसाठी २२ फेब्रुवारीपर्यंत तब्बल १७ हजारांहून अधिक सूचना व हरकती आल्या. त्यांची छाननी अंतिम टप्प्यात आली आहे. यातील प्रत्येक सूचनेची दखल घेण्यात येत असून व्यक्ती, सूचना, संबंधित रस्ता, सूचनेबाबत पालिकेने घेतलेली भूमिका या पद्धतीने पाहणी सुरू आहे. काही निवासी संघटनांनी रस्त्यावरील फेरीवाल्यांना संमती दिली आहे तर काहींनी थेट नकार दिला आहे. आमच्या रस्त्यावर फेरीवाले नकोत यांसारख्या कोणतेही कारण नसलेल्या सूचनांचा विचार केला गेलेला नाही. त्याचप्रमाणे माझ्या दुकानासमोर फेरीवाले नको, या प्रकारच्याही अनेक सूचना आल्या आहेत, मात्र त्याचा विचार करता येणार नाही, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वडाळा येथे प्रस्तावित जागा रेल्वेस्थानकापासून १५० मीटरच्या अंतरात येते ही सूचना स्वीकारली गेली. पारसी कॉलनीमध्ये ना फेरीवाला क्षेत्र असल्याने फेरीवाले नकोत, अशी सूचना होती. मात्र संबंधित रस्ता ना फेरीवाला क्षेत्रात येत नसल्याचे कळल्यावर ही सूचना रद्दबातल करण्यात आली. ना. म. जोशी मार्गावर अनेक शाळा असल्याने व  वाहनांची गर्दी असल्याने फेरीवाले नकोत, ही स्थानिकाची सूचना लक्षात घेण्यात आली आहे. या व अशा अनेक सूचनांमध्ये प्रत्यक्ष पाहणीचीही गरज आहे. त्यामुळे येत्या काळात वॉर्डकडून संबंधित रस्त्याबद्दल माहिती घेण्यात येणार असून प्रत्यक्ष जागेवर जाऊन फेरीवाल्यांच्या जागांची शहानिशा केली जाईल, असे विशेष उपायुक्त निधी चौधरी म्हणाल्या. यासंबंधी वॉर्ड अधिकाऱ्यांनाही सूचना पत्र पाठवण्यात येत असून त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सुनावणी घेतली जाईल.

नोंदणी प्रक्रियेला सुरुवात

महानगरपालिकेकडे ९९ हजार ४३५ फेरीवाल्यांनी नोंदणीसाठी अर्ज केले होते. गेली दोन वर्षे हे अर्ज कोणत्याही प्रक्रियेविना वॉर्ड अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पडून होते. मात्र आता त्यावरील धूळ झटकली गेली असून नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कार्यालयात जमा करण्यासंबंधीचे सूचना-पत्र पाठवले जात आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यावर फेरीवाल्यांची नोंदणी होऊ शकेल. यातही काही फेरीवाले बाद होण्याची शक्यता आहे.