नवमतदारांच्या नावांचा समावेश नाही

निवासाचा पत्ता बदललेल्या, तसेच १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर नाव नोंदणी केलेल्या बहुसंख्य मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्टच झाली नसल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या बहुसंख्य तरुण-तरुणींच्या उत्साहावर पाणी पडले. तर पालिका निवडणुकीचा प्रभाग आणि त्यातील मतदान केंद्र यासाठी मतदारांच्या स्वतंत्र मतदार याद्या तयार करण्यात आल्या आणि या दोन्ही मतदार याद्यांमधील मतदारांना दिलेले अनुक्रमांक वेगवेगळे असल्यामुळे मतदानाच्या दिवशी प्रचंड गोंधळ उडाला.

मागे पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदारांची यादी निवडणूक आयोगाने पालिकेला दिली होती. या यादीत तब्बल १ कोटी २ लाख मतदारांची नावे होती. ही मतदार यादी मिळताच पालिकेने निवडणुकीच्या कामासाठी १० हजार निरीक्षकांची नियुक्ती केली आणि तिची प्रभागनिहाय विभागणी करण्यात आली. पालिकेने नियुक्त केलेल्या निरीक्षकांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या नावाची पडताळणीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. त्यानंतर प्रभागनिहाय मतदारयाद्या तयार करण्यात आल्या. सूचना-हरकती मागविण्यात आल्यानंतर आवश्यक ती दुरुस्ती करून मतदार यादी आयोगाकडे सादर करण्यात आली. दरम्यानच्या काळात निवास पत्ते बदलले आणि १८ वर्षे पूर्ण झाल्याने नावनोंदणी केलेल्या तब्बल २.५ लाख मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे सोपविण्यात आली. परंतु आयोगाकडून पालिकेला सादर केलेल्या यादीमध्ये यापैकी अनेक मतदारांची नावेच नसल्याचे उघडकीस आले आहे. मतदार यादीचा घोळ सुरू असताना मतदाराचे वास्तव्य असलेली चाळ आणि विभागाचे नावही यादीतून वगळण्यात आले. अनुक्रमांक बदलण्यात आल्याने प्रभाग यादीत समाविष्ट असलेल्या मतदाराचे नाव मतदान केंद्र यादीत शोधणे अवघड बनले. दोन्ही याद्यांमध्ये अनुक्रमांक समान ठेवण्यात आला असता तर मतदारांची नावे शोधणे सहज शक्य झाले असते. परंतु मतदारांना आपले नाव शोधण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागला. त्यात बराचसा वेळ वाया गेला. या घोळामुळे मनस्ताप व्यक्त करीत मतदान न करताच काही मतदारांनी घरची वाट धरली.