मुंबईत अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठी मदत करत असलेला अभिनेता सोनू सूद सध्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेमुळे चर्चेत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनामधून सोनू सूदच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अप्रत्यक्षपणे त्याचा संबंध भाजपाशी जोडला आहे. संजय राऊत यांनी या केलेल्या टीकेवर सोनू सूदला विचारण्यात आलं असता त्याने प्रतिक्रिया देणं टाळलं. मजूर आणि कामगारांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी अनेकांचं सहकार्य मिळत आहे. या सर्वांचा मी आभारी आहे असं सोनू सूदने सांगितलं आहे.

सोनू सूद लॉकडाउन जाहीर झाल्यापासून मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करत आहे. ट्रेन, बस, विमानाच्या सहाय्याने सोनू सूद मजुरांची मदत करत आहे. पण सोमवारी जेव्हा सोनू सूद मजुरांना निरोप देण्यासाठी वांद्रे टर्मिनसला पोहोचला तेव्हा मात्र त्याला रेल्वे पोलिसांनी फलाटावर जाण्याची परवानगी नाकारली. सोनू सूदने उत्तर प्रदेशच्या आजमगड येथे जाण्यासाठी मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ट्रेनची व्यवस्था केली होती.

सोनू सूदला यावेळी रेल्वे पोलिसांनी परवानगी न देण्याबद्दल विचारलं असता त्याने सांगितलं की, “परवानगी दिली नसल्याचा मला फरक पडत नाही. मला प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी मिळाली की नाही हे महत्त्वाचं नसून माझं काम मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवणे आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी येथे आलो होतो”.

यानंतर त्याला शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेसंबंधी विचारण्यात आलं असता सोनू सूदने उत्तर देणं टाळलं. “मजूर आणि कामगारांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी अनेकांचं सहकार्य मिळत आहे. या सर्वांचा मी आभारी आहे,” असं सोनू सूदने सांगितलं. “ज्यांना माझी गरज आहे तिथे मी पोहोचत राहणार. शेवटची व्यक्ती घरी पोहोचत नाही तोपर्यंत मी मदत करत राहणार,” असा निर्धारही यावेळी त्याने व्यक्त केला. शिवसेनेसोबतचे गैरसमज दूर झाले का असं विचारण्यात आला असता कोणताही गैरसमज नाही, सर्व काही ठीक आहे असंही त्यांने सांगितलं.