मुंबईत पोहोचताच अभिनेत्री कंगना रणौतने ट्विटरला व्हिडीओ शेअर करत मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे आज तुम्ही माझं घर तोडलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल असं कंगनाने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे कंगनाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आहे. कंगनाने मुंबईतील परिस्थिती पाकिस्तानव्याप्त काश्मीरप्रमाणे असल्यासारखं म्हटल्याने टीका झाली होती. यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर कंगनाने आपल्याला मुंबईत पुन्हा येऊ नको अशा धमक्या दिल्या जात आहेत असं सांगितलं होतं. तसंच आपण ९ तारखेला मुंबईत येत असून कोणच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा असं आवाहन दिलं होतं. यानंतर बुधवारी कंगना मुंबईत पोहोचली.

आणखी वाचा- “…मगर याद रख बाबर, यह मंदिर फिर बनेगा”, कंगनाने केलं सूचक ट्विट

मुंबईत पोहोचताच कंगनाने व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने म्हटलं आहे की, “उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं…फिल्म माफियांसोबत मिळून माझं घर तोडून तुम्ही बदला घेतला आहे. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल. हे वेळेचं चक्र आहे, नेहमी सारखं राहत नाही हे लक्षात ठेवा. पण तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत. काश्मिरी पंडितांना कसं वाटतं हे मला आज कळालं. आज मी या देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्या नाही तर काश्मीरवरही चित्रपट तयार करणार. आपल्या देशवासियांना जागरुक करणार. ही क्रूरता आणि दहशतवाद माझ्यासोबत झाला हे चांगलं आहे, कारण याचा काही अर्थ आहे. जय हिंद…जय महाराष्ट्र”.

आणखी वाचा- “शंका निर्माण होण्याची संधी…”, कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईवर शरद पवारांनी केलं भाष्य

आपण मुंबईत येणार असून रोखून दाखवण्याचं आव्हान दिल्यानंतर कंगना बुधवारी दुपारी मुंबईत दाखल झाली. कंगना मुंबईत येणार असल्याने विमानतळाबाहेर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला पहायला मिळाला. एकीकडे रिपाइंचे कार्यकर्ते कंगनाला सुरक्षा देण्यासाठी हजर असताना शिवसेना कंगनाविरोधात आंदोलन करत होती. यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. मुंबई विमानतळावरुन कंगना पोलिसांच्या सुरक्षेत आपल्या घरी पोहोचली.

कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. दरम्यान पालिकेच्या कारवाईविरोधात कंगनाच्या वकिलाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली असून उद्या दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे. न्यायालयाने पालिकेकडे उत्तरही मागितलं आहे.