अक्षय कुमार, अनुष्का, कंगना आघाडीवर

बांधकाम उद्योगाने आतापर्यंत घरांच्या विक्रीसाठी ग्राहकांना विविध प्रलोभने देत आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. क्वचितच एखाद्या सिनेतारकेकडून गृहप्रकल्पाची जाहिरात केली जात आहे. परंतु आता काही बांधकाम कंपन्यांनी गृहप्रकल्पांच्या विपणनासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसिडर नेमले आहेत. अभिनेता अक्षय कुमार याच्यासह अनुष्का शर्मा तसेच कंगना रानावत या अभिनेत्री सध्या आघाडीवर आहेत. मुंबई तसेच महानगर परिक्षेत्रातील गृहप्रकल्पांच्या जाहिरातींमध्ये ते झळकू लागले आहेत.

निश्चलनीकरणानंतर आधीच मंदीत असलेला बांधकाम उद्योग पार कोलमडला होता. त्यातच रिएल इस्टेट कायद्यानुसार महारेरा या नियामक प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर बांधकाम उद्योग ठप्प झाला होता. आता हळूहळू हा उद्योग कात टाकू लागला आहे. महारेरामध्ये आपल्या गृहप्रकल्पांची नोंदणी करून अनेक विकासकांनी आता घरांच्या विक्रीवर भर दिला आहे. घरांच्या किमती आणखी कमी होतील याच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकाला आपल्याकडे खेचण्यासाठी काही कंपन्यांनी ब्रँड अ‍ॅम्बेसिडर नियुक्त केले आहेत.

लोढा कंपनीच्या ठाण्यातील ‘अमरा’ आणि ‘कासा सेलेस्ट’ या प्रकल्पांसाठी अक्षय कुमार हा अभिनेत्री पत्नी ट्विंकल खन्ना हिच्यासह जाहिरातीत झळकला आहे. लोढा समुहाच्या सात गृहप्रकल्पांचा तो ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे. मुंबईत परवडणाऱ्या छोटय़ा घरांची पहिल्यांदा निर्मिती करणाऱ्या ‘प्लॅटिनम कॉर्प ‘या बांधकाम कंपनीने आपल्या अप्पर जुहू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डी. एन. नगर परिसरातील ‘प्लॅटिनम वॉग’ या प्रकल्पासाठी अभिनेत्री कंगना रानावत हिला ब्रँड अ‍ॅम्बेसिडर नियुक्त केले आहे. रुपारेल रिएल्टीने आपल्या कांदिवली तसेच अन्य गृहप्रकल्पांसाठी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला करारबद्ध केले आहे. निश्चलनीकरण आणि महारेराच्या निर्मितीनंतर या गृहप्रकल्पांनी थाटात जाहिरात करताना ब्रँड अ‍ॅम्बेसिडर ही संकल्पना राबविली आहे. पुण्यातील अमिल डेव्हलपर्सने सचिन तेंडूलकर याचा जाहिरातीत वापर केला आहे.  शाहरुख खान हा नोईडातील मॅग्नम ग्रुपचा तर विराट कोहली हा बंगळुरूमधील नितेश इस्टेटचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे.

याबाबत या कंपन्यांशी संवाद साधला असता त्यांनी सामाईक उत्तर दिले. या कंपन्यांच्या प्रवक्तयांनी सांगितले की, निश्चिलनीकरण आणि महारेराच्या स्थापनेनंतर उद्योगात एक शिस्त आली आहे. ग्राहकही आता अधिक जागरुक झाला आहे.  ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यातही विकासकांमध्ये चढाओढ आहे.  महारेरा नोंदणीकृत असेल तरच हे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर प्रकल्प स्वीकारीत आहे. त्यामुळे आपसूकच ग्राहकांची फसवणूक टळणार आहे.