मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात अटकेपासून दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ९ जून पर्यंत पुढे ढकलली आहे. उन्हाळी सुट्टीनंतर नियमीत खंडपीठासमोर यावर सुनावणी होणार आहे.

अकोल्यामध्ये परमबीर सिंग यांच्या विरोधात एप्रिल महिन्यात भ्रष्टाचाराच्या आरोपात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी ही एफआयआर दाखल केलेली आहे. परमबीर सिंग यांच्यासह २६ पोलीस अधिकाऱ्यांचे या एफआयआरमध्ये नावं आहेत. या सर्वांवर गुन्हेगारी षडयंत्र रचणे, पुरावे नष्ट करणे आणि एससी-एसटी अॅक्ट अंतर्गत केस दाखल केली गेली होती.

परमबीर सिंगांना २० मेपर्यंत अटक नाहीच!, महाराष्ट्र सरकारचं उच्च न्यायालयासमोर स्पष्टीकरण

पोलीस निरीक्षक घाडगे यांनी आरोप केला आहे की, परमबीर सिंग जेव्हा ठाणे पोलिसात होते, तेव्हा त्यांच्याकडून लाच मागण्यात आली होती. घाडगेंनी असं देखील म्हटलं आहे की, याप्रकरणी त्यांनी तेव्हाही तक्रार केली होती, मात्र काहीच सुनावणी झाली नाही. परमबीर सिंग २०१५ पासून २०१८ पर्यंत ठाणे पोलीस आयुक्त होते. घाडगेंनी म्हटले आहे की, परमबीर सिंग यांनी त्यांना गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या आरोपींविरोधात अनेकदा आरोपपत्र दाखल न करण्यासही सांगितलेले आहे.