‘हिट अॅंड रन’प्रकरणी अभिनेता सलमान खान याने सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेला स्थगिती द्यावी, यासाठी त्रयस्थ व्यक्तीकडून करण्यात आलेली याचिका सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. खूनाच्या खटल्यातील दोषी व्यक्तीकडून ही याचिका करण्यात आली होती. त्या व्यक्तीनेही उच्च न्यायालयात त्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात याचिका दाखल केली असून, त्यावर अद्याप सुनावणी न झाल्याने सलमान खानची याचिका फेटाळण्यात यावी, अशी मागणी त्याने केली होती.
सेलिब्रिटी व्यक्तींच्या याचिकांवर न्यायालयात लवकर सुनावणी होते. त्याचवेळी सर्वसामान्यांच्या याचिकांवर सुनावणी होऊन निकाल न दिल्याने त्यांना तुरुंगात खितपत पडावे लागते, असा आरोप याचिकाकर्त्याने केला होता. या संदर्भात त्याने मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्रपणेही एक याचिका दाखल केली आहे.
दरम्यान, न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांनी अशा पद्धतीने स्थगिती देण्यास नकार दिला. ‘हिट अॅंड रन’प्रकरणी सरकारी आणि बचाव पक्ष या दोन्ही बाजूंनी या खटल्याची सुनावणी जलदगतीने होण्यास सहमती दर्शविली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.