सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशी रद्द

मुंबई : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने अतुल लोटे या आरोपीला सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने गुरूवारी तीन वर्षांनंतर रद्द केली. मात्र बलात्कार आणि हत्येच्या आरोपातून लोटे याची सुटका करण्यास नकार देत हे प्रकरण पुन्हा ठाणे सत्र न्यायालयाकडे वर्ग केले.

प्रक्रियेत त्रुटी राहिल्याच्या कारणास्तव न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने ही शिक्षा रद्द केली. एवढेच नव्हे, तर खटल्याच्या सुनावणीदरम्यान झालेल्या  चुका दूर करण्यासाठी पुराव्यांची पुनर्पडताळणी करून नव्याने खटला चालवायचा वा नव्याने आरोप निश्चित करायचे हे ठरवावे, असे आदेशही ठाणे न्यायालयाला दिले.

सात वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप लोटे याच्यावर होता. मात्र ठाणे न्यायालयाने शिक्षा सुनावण्याच्या दोन दिवस आधीच, बलात्काराच्या आरोपाऐवजी नव्या कठोर कलमांनुसार त्याला बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) दोषी ठरवत २८ सप्टेंबर २०१६ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. ऐनवेळी केलेल्या या बदलावर बोट ठेवत लोटे याने या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

उच्च न्यायालयाने याची दखल घेत प्रक्रियेतील या त्रुटीकडे दुर्लक्ष करता येणार नाही असे स्पष्ट केले. असे असले तरी त्याला ज्या आरोपात दोषी ठरवण्यात आले त्यातून त्याची सुटका करण्यास नकार दिला. तसेच ठाणे न्यायालयाकडे प्रकरण पुन्हा वर्ग करत नव्याने खटला चालवण्याचे आदेश दिले.