मुंबई : करोना संसर्गाविरोधातील लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस देण्यावर एकमत झाले असून, सोमवारी त्याबाबत घोषणा करण्यात येणार आहे.

मात्र बोनसपोटी किती रक्कम द्यायची यावर एकमत झालेले नाही. तथापि, गतवर्षीच्या तुलनेत ५०० रुपयांची वाढ करून १५ हजार ५०० रुपये बोनस देण्यात येण्याची शक्यता आहे.

करोनामुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. करोनाकाळात  प्राणाची पर्वा न करता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

गेल्या वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. यंदा आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन बोनसच्या रकमेत वाढ न करता १५ हजार रुपये द्यावे, असा एक मतप्रवाह पालिकेत आहे. त्याच वेळी किमान ५०० रुपये वाढवून १५ हजार ५०० रुपये बोनस द्यावा, असे काही अधिकारी आणि नगरसेवकांचे म्हणणे आहे. यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत एक लाख कर्मचारी आहेत.

पूर्ण बोनस देण्याची मागणी

* गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिका अनुदानित प्राथमिक शाळांमधील सुमारे ४,५०० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची निम्मीच रक्कम देण्यात येते. यंदापासून बोनसची पूर्ण रक्कम देण्यात यावी, अशी मागणी मुंबई शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघाने केली आहे.

*  प्रदीर्घ काळ संघर्ष केल्यानंतर २००९ मध्ये पालिकेने बोनस देण्याची तयारी दाखविली. मात्र पालिकेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत त्यांना केवळ ५० टक्केच बोनस देण्यात येतो. याबाबत अनेक वेळा पालिका प्रशासनाला पत्रही पाठविण्यात आले. मात्र अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे.