News Flash

मालाडच्या जलबोगद्याला तडे..

पालिकेकडून रितसर परवानगी मिळवून खोदण्यात येत असलेल्या कूपनलिकेमुळे मालाड येथील जलबोगदा बुधवारी रात्री फुटला असून त्याच्या दुरुस्तीसाठी

| November 15, 2013 05:08 am

पालिकेकडून रितसर परवानगी मिळवून खोदण्यात येत असलेल्या कूपनलिकेमुळे मालाड येथील जलबोगदा बुधवारी रात्री फुटला असून त्याच्या दुरुस्तीसाठी मुंबईकरांच्या खिशातून सात कोटी रुपये काढले जाणार आहेत. या बोगद्याच्या दुरुस्तीमुळे १ डिसेंबरपर्यंत गोरेगाव ते दहिसर परिसरात पाणीकपात करण्यात आली असून पाणीपुरवठय़ाच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत.
मालाड पूर्व येथील रामलीला मैदानाजवळच्या पुष्पांजली सोसायटीमध्ये कूपनलिकेचे काम सुरू असताना त्याखालून जाणाऱ्या जलबोगद्याला तडे गेल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली. या बोगद्याची दुरुस्ती करणे अत्यावश्यक असून त्यासाठी सुमारे सात कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चाला परवानगी देण्यासाठी गुरुवारी पालिकेतील गटनेत्यांची तातडीने बैठक बोलावण्यात आली. पालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडली असल्याचा आरोप पालिकेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला. कूपनलिकेसाठी विभागीय सहाय्यक जलअभियंत्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी इमारत मंजूर आराखडा व कूपनलिकेच्या जागेचा आराखडा आवश्यक असतो. अभियंत्यांनी जागेची पाहणी न करताच परवानगी दिल्याने ही घटना घडली आहे, असे आंबेरकर म्हणाले. या दुरुस्तीसाठी होणारा सुमारे सात कोटी रुपयांचा खर्च या अधिकाऱ्यांकडूनच वसूल करण्यात यावा, अशी मागणीही विरोधी सदस्यांनी केली आहे.
तीन वर्षांपूर्वी, २०१० मध्ये मालाडमध्येच लिबर्टी गार्डन येथे कूपनलिकेमुळे जलबोगदा फुटला होता तेव्हा कूपनलिकेला परवानगी न घेतल्याचे कारण पुढे करून पालिकेने दंड ठोठावला होता. मात्र यावेळी पालिकेकडे असलेला जलबोगद्याचा आराखडाच चुकीचा असल्याची सारवासारव अधिकारी करत आहेत. संबंधित प्रकरणाची चौकशी करून अधिकारी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले असले तरी सात कोटी रुपयांचा भूर्दंड करदात्यांवर  बसणार आहे, हे
उघड आहे.
या जलबोगद्याच्या दुरुस्तीचे काम शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून हाती घेण्यात येणार असून दुरुस्ती पूर्ण होण्यासाठी १६ दिवस लागतील. त्यामुळे १ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली व दहिसर या उपनगरातील पश्चिम विभागात २५ टक्के तर पूर्व विभागात १० टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. या विभागातील पाणीपुरवठय़ाच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत. या परिसरात पाण्यासंबंधी तक्रार असल्यास २६१४६८५२ किंवा २६१८४१७३ या क्रमांकावर पालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 5:08 am

Web Title: borewell digging ruptures water tunnel in malad
Next Stories
1 सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता अखेर मार्गी
2 अनधिकृत रेल्वे तिकिटे विकणाऱ्या महिलेला अटक
3 चंदा कोचर यांचे आठ बनावट ईमेल!
Just Now!
X