मुंबई, ही तीन अक्षरे उच्चारल्यानंतर प्रामुख्याने नियो ग्यॉथिक स्थापत्यशैलीत उभी राहिलेली बोरिबंदर स्थानकाची आणि आताच्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसची इमारत मुंबईबाहेरच्या लोकांच्या डोळ्यासमोर उभी राहते. ही तसेच या इमारतीसमोरच टेचात उभी असलेली मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत यांचा आराखडा तयार करणाऱ्या स्थापत्य अभियंत्याचे थडगे मात्र मुंबईतील एका उपनगरातील ख्रिस्ती दफनभूमीत पडून आहे.
 काही वर्षांपूर्वी कोरीव दगडी बांधकामातील या थडग्याचे नूतनीकरण करण्याच्या नावाखाली पालिकेने केवळ एक संगमरवरी चौथरा उभारून या महान स्थापत्य विशारदाची उपेक्षाच केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेत या थडग्याला पुन्हा कलात्मक डूब देत ‘मुंबईकर’ स्टीव्हन्स यांचे यथोचित स्मारक उभारण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
ब्रिटिशकालीन मुंबईतील अनेक महत्त्वाच्या वास्तूंच्या उभारणीत फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स अर्थात एफ. डब्लू. स्टीव्हन्स यांचा वाटा सिंहाचा होता. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या ऐतिहासिक इमारतीचा आराखडा त्यांनी आखला होता. तसेच मुंबई महापालिकेची भव्य वास्तूही त्यांच्याच स्थापत्य कौशल्याचा नमुना आहे. १९०० साली वयाच्या अवघ्या ५२व्या वर्षी मलेरियामुळे स्टीव्हन्स यांचा मृत्यू झाला. त्यांचे दफन शिवडी येथील ख्रिस्ती दफनभूमीत करण्यात आले. त्यांचा मुलगा चार्ल्सही स्थापत्य अभियंता होता आणि त्याने पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयाची इमारत उभारली आहे. शिवडी येथील आर. ए. किडवई मार्गाजवळ असलेल्या या दफनभूमीत स्थापत्यशास्त्राचे उत्तम नमुने म्हणता येतील, अशी १९व्या शतकातील थडगी आहेत.
स्थापत्यशास्त्रात सौंदर्यदृष्टी असलेल्या स्टीव्हन्स यांचे थडगेही त्यांच्या इतमामाला साजेसे होते. मात्र पालिकेने काही वर्षांपूर्वी या थडग्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्योत्तर काळात बांधलेल्या कोणत्याही सरकारी इमारतीप्रमाणे रंग, रूप, आकार आणि सौंदर्यदृष्टी यांचा अभाव या नव्या थडग्यातही दिसतो. हे थडगे म्हणजे केवळ संगमरवरी लाद्यांचा चौथरा असून त्यात काहीच कलात्मकता नाही. मुंबईतील दिमाखदार इमारती उभारणाऱ्या स्टीव्हन्स यांचे थडगे अशा प्रकारे असावे, ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचे महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेच्या रस्ते व आस्थापना विभागाचे उपाध्यक्ष मिलिंद पांचाळ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
याबाबत पांचाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनाही विनंतीपत्र पाठवले आहे. स्टीव्हन्स हे मुंबईकर होते. त्यांनी उभारलेल्या वास्तूमध्ये बसून आज लोकप्रतिनिधी मुंबईचा गाडा हाकत आहेत. त्यामुळे त्यांचे यथोचित स्मारक उभे करून त्यांच्या योगदानाबाबत कृतज्ञता व्यक्त करायला हवी, असे पांचाळ यांनी या पत्रात म्हटले आहे. याबाबत पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.