लाच घेताना रंगेहात पकडलेल्या महसूल, नगरविकास, गृह, परिवहन, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम इत्यादी विभागांतील २१ अधिकाऱ्यांची १६० कोटी ८२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यास अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. अद्यापही ३० प्रकरणांतील सुमारे ३४ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्याची प्रकरणे परवानगीसाठी शासनाकडे प्रलंबित आहेत.
लाच घेताना पकडलेल्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केले जाते. त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी व त्यांच्याकडील बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यासाठी शासनाची परवानगी लागते. अशी परवानगीविना बरीच प्रकरणे शासनाकडे प्रलंबित होती.  २५ फेब्रुवारी ते १० मार्च या दरम्यान २१ प्रकरणांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्यास गृह विभागाने मान्यता दिली आहे. त्यात महसूल व पोलीस दलातील गाजलेल्या ठाणे जिल्ह्य़ातील तत्कालीन उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर व पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यातील माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांच्या मालमत्तेचा समावेश आहे.
 नगरविकास विभागातील उपसचिव आनंदराव जिवणे  यांच्याकडील १ कोटी ७१ लाख ३४ हजार ९९६ रुपयांची मालमत्ता जप्त करण्यास गृह विभागाने मंजुरी दिली आहे. ठाण्यातील माजी अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब पाटील यांची १० कोटी ३० लाख ७५ हजार ५७२ रुपयांची मालमत्ता गोठवण्यास मान्यता  दिली आहे. निवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सज्जाद राजेखान बारगीर यांच्याकडील १ कोटी ६ लाख ८९ हजार ८१ रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे.
कारवाईत बडे अधिकारी
नवी मुंबईतील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता गेसु दराज महंमद अमिर खान ( रुपये-२८५१८३१), पोलीस निरीक्षक राजेश धनावडे (रुपये-३१६५४०७), भरत सावंत, अधीक्षक मुंबई महापालिका कर निर्धारण विभाग (रुपये-४०५६२५९ ), अशोक माने, वरिष्ठ सहाय्यक, ससून रुग्णालय, पुणे (रुपये-२११९०००), दगडू गायकवाड, माजी अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग ( रुपये-६५९५००), सुभाष तिवारी, पोलीस शिपाई (रुपये-१८३५९३७), ओमप्रकाश शिरपुरिया, मत्स्य विकास अधिकारी (रुपये-११५०००), रामेश्वर बोपचे, शाखा अभियंता, रोजगार हमी योजना (रुपये-१३७२४९९ ), लक्ष्मण केदारे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (१४७६९७५) हेमराज निमजे, ग्रामविकास अधिकारी (रुपये १३९३३७९), महादेव डाखोरे, पोलीस हवालदार (रुपये २८ २२ २२२), गुलाम मोहीयोदीन, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (रुपये-१८४५२९३), विजयकुमार बिराजदार शाखा अभियंता, जलसंपदा विभाग (रुपये-३८२१२२४) या अधिकाऱ्यांची मालमत्ता गोठविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.