महाराष्ट्रात इतर पक्षांपासून कायम दोन हात दूर राहणाऱ्या बहुजन समाज पक्षातील फुटीर गटाने रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांशी तसेच डाव्या पक्षांशी मात्र जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. बसपमधील बंडखोर नेते डॉ. सुरेश माने यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या बहुजन रिपब्लिकन सोश्ॉलिस्ट पार्टीच्या पहिल्या अधिवेशनाला रिपब्लिकन नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

मायावती यांच्या कार्यपद्धतीला आव्हान देत माने यांनी स्वंतत्र पक्षाची स्थापन केली. बसपमधील बरेच पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, असा त्यांचा दावा आहे. येत्या ४ व ५ डिसेंबरला त्यांच्या पक्षाचे पहिले अधिवेशन होत आहे. उद्घाटक म्हणून संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांना निमंत्रित करण्यात आले आहे.त्याशिवाय खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, शेकापचे आमदार जयंत पाटील, संविधान मोर्चाचे सुधीर सावंत, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सुनील खोब्रागडे, आदी नेत्यांनाही एका व्यासपीठावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या सर्व नेत्यांनी निमंत्रण स्वीकारले असल्याचे माने यांनी सांगितले.