आज फडणवीस सरकारने सादर केलेला अर्थ संकल्प म्हणजे जनतेच्या हातात वाटाण्याच्या अक्षता देण्याचा प्रकार असून राज्यातील सर्व वर्गांना निराश करणारा आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

पाटील म्हणाले, हा अर्थसंकल्प होता की निवडणुकीचे प्रचाराचे भाषण होते अशी आम्हाला शंका आहे. अर्थसंकल्प मांडताना सुधीर मुनगंटीवार यांच्या चेहऱ्यावर आगामी निवडणुकीतील पराभव स्पष्ट दिसत होता. अर्थसंकल्पात योजना प्रस्तावित करणे अपेक्षित असते मात्र, सुधीर मुनगंटीवार यांनी भाषणाचा सारा वेळ केवळ सरकारने केलेल्या कामांची यादी वाचण्यात घालवला.

राज्यात सध्या भयावह दुष्काळ पडलेला असताना हे सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना जाहीर करेल असे अपेक्षित होते. मात्र, शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस योजना या सरकारने जाहीर केलेली नाही. विविध महत्वाच्या योजनांसाठी केलेल्या तरतुदी अत्यंत अपुऱ्या असून त्यातूनही काहीही साध्य होणार नाही, असे ते म्हणाले.

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर या शहरांना स्मार्ट सिटीसाठी केवळ २४०० कोटी रुपये दिले आहेत. सागरमाला सारख्या नितीन गडकरी यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी या सरकारने केवळ २६ कोटींची तरतूद केली आहे. राज्यातील विमानतळांच्या विविध सुविधांसाठी केवळ ६५ कोटी रुपयात काय होणार आहे, असा सवाल जयंत पाटील यांनी केला. तसेच राज्यात एकूण ५९२ एसटी स्थानके आहेत. या स्थानकांच्या नूतनीकरणासाठी तरतूद केलेल्या १०१ कोटी रुपयात ५९२ पैकी दहा स्थानकांचे सुद्धा व्यवस्थित नूतनीकरण होवू शकणार नाही, असे ते म्हणाले.

मराठा आरक्षण व सवर्ण आरक्षण याचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला मात्र यामुळे निर्माण होवू शकणारा संविधानात्मक पेच हे सरकार कसा सोडवणार आहे यावर मात्र कोणतेही भाष्य केले नाही. प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेचे अपयश आम्ही वारंवार अधोरेखित केले असूनही या योजनेसाठी सरकारने ९० कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेवून सत्तेत आलेल्या या सरकारने छत्रपती शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची एक विटही रचलेली नाही. घोषणा केलेला एकही महत्वाचा प्रकल्प या सरकारने पूर्ण केलेला नाही असाही आरोपही यावेळी पाटील यांनी केला.