पबमधून  रात्री उशिरा मद्यधुंद अवस्थेत घरी परतलेल्या तरुणीवर इमारतीच्या आवारातच बलात्कार करणाऱ्या सुरक्षारक्षकाला सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा ठोठावली. २४ जानेवारी २०१४ रोजी पवईत ही घटना घडली होती. विशेष म्हणजे या तरुणीला आरोपी माहीत नसताना पोलिसांनी मोठय़ा कौशल्याने परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात सादर केले होते. पीडित २६ वर्षीय तरुणी नृत्यशिक्षिका आहे. २४ जानेवारी २०१४च्या रात्री ती मुंबई उपनगरातील एका पबमध्ये गेली होती. तेथे मित्रांसमवेत मद्यपान केल्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास ती घरी परतली. तिच्या दोन मित्रांनी तिला पवईच्या घराच्या इमारतीसमोर रिक्षाने पोहोचवून ते निघून गेले. त्यावेळी ही तरुणी पूर्णपणे मद्याच्या अमलाखाली होती. इमारतीचा सुरक्षारक्षक प्रमोदकुमार उपाध्याय (३०) याने या तरुणीच्या अवस्थेचा गैरफायदा घेत तिच्यावर इमारतीच्या आवारातच बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी पहाटे तरुणीच्या भावाला ती इमारतीच्या जिन्याखाली झोपलेली आढळली. तिला रुग्णालयात नेले असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले.