मुंबई : हॉटेल व्यावसायिक सतनामसिंग प्यारासिंग बोपाराय (५४) यांनी रविवारी रात्री बाराच्या सुमारास परवानाधारक बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. सतनाम भांडुपमधील शेरा हॉटेलचे मालक होते. तसेच त्यांनी सुरक्षा रक्षक पुरवणारी कंपनी सुरू केली होती.

मुलुंड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दारूच्या व्यसनामुळे त्यांचे यकृत निकामी झाले होते. तसेच त्यांना मधुमेह होता. त्यावरून आजारपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलीस व्यक्त करतात.

अपघाती मृत्यूची नोंद घेत पोलिसांनी पुढील चौकशी व तपास सुरू केला आहे.

बोपाराय पत्नी, दोन मुलांसह मुलुंड पश्चिमेकडील वसंत गार्डन, गोल्डन विलोज इमारतीत वास्तव्यास होते. पोलिसांना घटनास्थळावरून बोपाराय यांची बंदूक, रिकामी पुंगळी आणि पाच जिवंत काडतुसे सापडली. घटना घडली तेव्हा बोपाराय यांच्या पत्नी घरातील अन्य खोलीत उपस्थित होत्या.