पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी मध्य रेल्वेकडे जागा नाही

मध्य रेल्वेवरून दर दिवशी प्रवास करणाऱ्या ४० लाखांहून अधिक प्रवाशांचा उपनगरीय रेल्वे प्रवास सुखकर करण्यासाठी आवश्यक अशा पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पासाठी मध्य रेल्वेला आपल्या ताब्यातील पुरातन वास्तू जमीनदोस्त करावी लागणार आहे. भारतीय रेल्वेच्या अगदी सुरुवातीपासून सेवेत असलेल्या भायखळा स्थानकाची ऐतिहासिक इमारत सीएसटी-कुर्ला यांदरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी इतिहासजमा करावी लागणार आहे. या मार्गिका टाकण्यासाठी मध्य रेल्वेकडे भायखळा पूर्व येथे जागा नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा आराखडा मध्य रेल्वेकडे तयार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर दिली. याबाबत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल यांना विचारले असता अधिक माहिती घेऊन आपण याबाबत सांगू, असे त्यांनी स्पष्ट केले.

इमारत जमीनदोस्त होण्यामागचे कारण?

कुर्ला-सीएसटी यांदरम्यानच्या या प्रकल्पाचे काम परळजवळ सुरू करण्यात आले आहे. ही मार्गिका कुर्ला ते परळ यांदरम्यान पश्चिमेकडून जाणार आहे. त्यानंतर परळच्या पुढे चिंचपोकळी स्थानकापर्यंत रेल्वेकडे पूर्व दिशेला जागा उपलब्ध आहे. भायखळा पूर्वेला रेल्वेमार्गाला लागूनच रेल्वेचेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आहे. त्याशिवाय मुंबईच्या दिशेला प्लॅटफॉर्म क्रमांक चारला खेटूनच अनेक निवासी इमारती उभ्या आहेत. त्यामुळे चिंचपोकळी स्थानकापुढे या मार्गिका पश्चिमेकडे नेण्यावाचून रेल्वेला गत्यंतर नाही. अशा परिस्थितीत सध्याची भायखळा स्थानकाची इमारत जमीनदोस्त करावी लागणार आहे.

ऐतिहासिक महत्त्व

  • १८५३मध्ये बोरीबंदर ते ठाणे यांदरम्यान धावलेल्या पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गावरील हे एक स्थानक होते.
  • मुंबईत दाखल झालेल्या पहिल्या इंजिनाची वाहतूक याच स्थानक परिसरात झाली होती.
  • सध्या अस्तित्त्वात असलेल्या भायखळा स्थानकाच्या इमारतीच्या बांधकामाचे नियोजन १८८०मध्ये सुरू झाले.
  • या स्थानकाचे बांधकाम १८९१मध्ये पूर्ण झाले आणि जुलै १८९१मध्ये हे स्थानक प्रवाशांच्या सेवेत आले.
  • ब्रिटिशांच्या काळात म्हणजे १८७८च्या आधी रेसकोर्स किंवा बॉम्बे टर्फ क्लब भायखळा स्थानकाच्या बाजूलाच होते. त्यामुळे बोरीबंदर स्थानकापेक्षा भायखळा स्थानकाचे महत्त्व मोठे होते.