शुल्कवाढ केल्यावर भायखळ्याच्या प्राणिसंग्रहालयात येणाऱ्यांची संख्या पहिल्या आठवडय़ात निम्म्याहून कमी झाली असली तरी पालिकेच्या तिजोरीतील उत्पन्न मात्र साडेतीन पटींनी वाढले आहे. ऑगस्टच्या पहिल्या तारखेपासून शुल्कवाढ केल्यानंतर पहिल्या आठ दिवसात पालिकेला दरदिवशी सरासरी १ लाख ३० हजार रुपये शुल्क मिळाले असून पेंग्विन आल्यानंतर वाढलेल्या गर्दीतही दिवसाचे सरासरी उत्पन्न ४० हजारापेक्षा कमी होते. पेंग्विन येण्यापूर्वी तर भायखळा प्राणिसंग्रहालयाचे दिवसाचे सरासरी उत्पन्न अवघे १५ हजार रुपये होते.
महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयानंतर भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात १ ऑगस्टपासून प्रौढांचे शुल्क पाच रुपयांवरून ५० रुपये तर १२ वर्षांखालील मुलांचे शुल्क दोन रुपयांवरून २५ रुपये करण्यात आले. दोन प्रौढ व दोन मुलांच्या कुटुंबासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाते. उद्यानात सकाळी फिरण्याचा मासिक पासही ३० रुपयांवरून १५० रुपये करण्यात आला. तब्बल २२ वर्षांनी ही शुल्कवाढ करण्यात आली. राणीबागेत पेंग्विनना पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली होती. त्यातच उन्हाळी सुट्टय़ांमुळेही गर्दीत भर पडली होती. शनिवार-रविवारी गर्दीमुळे वेळेआधीच प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ ओढवली होती. मात्र या दरम्यान सर्वच राजकीय पक्षांनी शुल्कवाढ करण्यास विरोध केल्याने पर्यटकांची संख्या वाढूनही उत्पन्नात वाढ झाली नव्हती. १८ मार्च ते १८ जुलै या चार महिन्यात तब्बल ९ लाख २६ हजार पर्यटकांनी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. याचाच अर्थ सरासरी साडेसात हजार पर्यटक दरदिवशी येत होते. शुल्कवाढ केल्यावर पहिल्या आठवडय़ात २३ हजाराहून अधिक पर्यटकांनी म्हणजे दरदिवशी तीन हजार पर्यटकांनी राणीबागेत पेंग्विनदर्शन घेतले. मात्र यातील सुमारे ९ हजार पर्यटक रविवारी आल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
शुल्कवाढ केल्यावर पर्यटकांच्या संख्येत निम्म्याहून अधिक घट झाली असली पालिकेच्या तिजोरीत मात्र साडेतीन पट अधिक रक्कम जमा होत आहे. १८ मार्च ते १८ जुलैदरम्यान दरदिवशी सरासरी ४० हजार रुपये याप्रमाणे पालिकेने ४८ लाख ९० हजार रुपये शुल्कातून मिळवले, तर ऑगस्टच्या पहिल्या आठ दिवसात रोजच्या सरासरी १ लाख ३७ हजार रुपयांप्रमाणे पालिकेच्या तिजोरीत तब्बल ११ लाख रुपये जमा झाले. सहा ऑगस्टच्या रविवारी प्राणिसंग्रहालयाला सुमारे ९ हजार पर्यटकांनी भेट दिली व तीन लाख १५ हजार रुपये शुल्क गोळा झाले.
‘शुल्कवाढ झाल्याच्या पहिल्या दोन दिवसात पर्यटकांची संख्या थोडी कमी होती, मात्र आता पुन्हा पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेषत रविवारी येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झालेली नाही. पेंग्विन येण्यापूर्वी राणीबागेत दरदिवशी सरासरी चार हजार पर्यटक येत. त्यापेक्षा पर्यटक व शुल्क या दोन्ही पातळ्यांवर वाढ झाली आहे,’ असेही संजय त्रिपाठी यांनी सांगितले.