राज्य सरकारच्या वाइल्ड लाइन वॉर्डनकडून परवानगीची प्रतीक्षा

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : मुंबईकर, तसेच देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षणस्थान बनलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानात (राणीचा बाग) सिंहाचे आगमन लांबणीवर पडलेले असताना प्रशासनाने काळे पट्टे असलेल्या वाघांची जोडी आणण्याची तयारी केली आहे. राज्य सरकारच्या वाईल्ड लाइन वॉर्डनकडून हिरवा कंदील मिळताच औरंगाबाद येथून वाघाची जोडी आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

गुजरातमधील जुनागड येथील प्राणिसंग्रहालयातील सिंहाची जोडी राणीच्या बागेत आणण्यास केंद्रीय प्राणिसंग्रहालय नियामक मंडळाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. मात्र सिंहाच्या बदल्यामध्ये जुनागड प्राणिसंग्रहालयाला दोन जोडय़ा झेब्रा द्यावा लागणार आहे.

झेब्रा खरेदीसाठी प्रशासनाने दोन वेळा निविदा काढल्या होत्या. प्रतिसाद न मिळाल्यामुळे झेब्रा खरेदीसाठी आता तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे राणीच्या बागेतील सिंहाचे आगमन लांबणीवर पडले आहे. आता प्रशासनाने राणीच्या बागेत वाघाची जोडी आणण्याची तयारी सुरू केली आहे.

औरंगाबाद येथील पालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील वाघांची जोडी राणीच्या बागेत आणण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. वाघाच्या जोडीच्या बदल्यात औरंगाबादमधील प्राणिसंग्रहालयाने चितळाच्या दोन जोडय़ा आणि टेंडर स्टॉर्क नामक पक्ष्याच्या दोन जोडय़ांची मागणी केली आहे. सध्या राणीच्या बागेत चितळ आणि टेंडर स्टॉर्क पक्षी उपलब्ध आहेत. त्यामुळे चितळ आणि टेंडर स्टॉर्क पक्षी देऊन राणीच्या बागेत वाघाची जोडी आणण्यात येणार आहे.

उभय प्राणिसंग्रहालयांतील वन्य प्राणी आणि पक्ष्यांच्या देवाण-घेवाणीला राज्य सरकारच्या वाईल्ड लाइफ वॉर्डनच्या परवानगीची आवश्यकता आहे. ही परवानगी मिळावी यासाठी राणीच्या बागेतील प्रशासनाकडून लवकरच वाईल्ड लाइफ वॉर्डनला पत्र पाठविण्यात येणार आहे.

आवश्यक ती परवानगी मिळाल्यानंतर तात्काळ औरंगाबाद येथून वाघाची जोडी आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. साधारण फेब्रुवारीच्या अखेरीस अथवा मार्चच्या पहिल्या पंधरवडय़ामध्ये वाघाची जोडी राणीच्या बागेत दाखल होऊ शकेल, असा विश्वास राणीच्या बागेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

वाघांची जोडी राणीच्या बागेत दाखल झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्यांना स्वतंत्र ठेवण्यात येईल. राणीच्या बागेत रुळल्यानंतर म्हणजे साधारण मेच्या दरम्यान वाघांचे दर्शन पर्यटकांना होऊ शकेल, अशी अपेक्षा या अधिकाऱ्याने व्यक्त केली. त्यामुळे यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी राणीच्या बागेतील वाघ आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.