मरोळ, मालाड, कांदिवलीतील प्रभागांचा समावेश

राज्य निवडणूक आयोगाने राज्यभरातील विविध महापालिकांच्या पोटनिवडणुकांची तयारी सुरू केली असून या पोटनिवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्याबाबत आयोगाने आदेश दिले आहेत. राज्यभरात २० रिक्तपदांसाठी पोटनिवडणुकांसाठी २७ मे रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध कराव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत. या २० रिक्त पदांमध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या चार प्रभागांतील पोटनिवडणुकांचाही समावेश आहे. जातपडताळणीमध्ये बाद झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यात मरोळमधील दोन जागा तर मालाडमधील एक आणि कांदिवलीतील एका जागेचा समावेश आहे.

जातपडताळणीमध्ये पालिकेतील मुरजी पटेल, केशरबेन पटेल, स्टेफी किणी, राजपती यादव या चार नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने या चार जागा रिक्त झाल्या होत्या. त्या जागी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या उमेदवारांमध्ये नगरसेवक पदाची आशा निर्माण झाली असताना निवडणूक आयोगाने हे परिपत्रक जाहीर केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने बृहन्मुंबई, नवी मुंबई, उल्हासनगर, कोल्हापूर, नाशिक , मालेगाव, कल्याण-डोंबिवली येथील पोटनिवडणुकांची तयारी सुरू केली आहे. १७ मे रोजी संबंधित प्रभागांतील प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात येतील, तर त्याकरिता १० एप्रिल रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या ग्राह्य़ धरण्यात येणार आहेत. २१ मेपर्यंत या याद्यांवर हरकती व सूचना मागवण्यात येतील व त्यानंतर २७ मे रोजी अंतिम याद्या जाहीर केल्या जाणार आहेत.

तर मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या २९ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत.

भाजपचे मुरजी पटेल, केशरबेन पटेल, काँग्रेसच्या स्टेफी किणी, राजपती यादव यांचे नगरसेवकपद उच्च न्यायालयाने बाद ठरवले होते. दरम्यान, या प्रकरणी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या उमेदवारांनी  आपल्याला नगरसेवक घोषित करावे म्हणून लघुवाद न्यायालयात धाव घेतली आहे. दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्यांमध्ये शिवसेनेच्या गीता भंडारी, एकनाथ उंडले, संदीप नाईक आणि काँग्रेसचे नितीन सलागरे यांचा समावेश आहे. त्याबाबत अद्याप सुनावणी सुरू असताना आलेल्या या परिपत्रकाविरोधात उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुरजी पटेल यांच्या जागी दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार असलेले नितीन सलागरे यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

या प्रभागांत पोटनिवडणूक

मालाडमधील प्रभाग क्रमांक ३२, कांदिवली प्रभाग क्रमांक २८, मरोळमधील प्रभाग क्रमांक ७६ आणि ८१

प्रभाग – अपात्र नगरसेवक पक्ष – दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार पक्ष

२८- राजपती यादव (काँग्रेस)- एकनाथ उंडले (शिवसेना)

३२- स्टेफी केणी (काँग्रेस)- गीता भंडारी (शिवसेना)

७६- केसरबेन पटेल (भाजप)- नितीन सलागरे (काँग्रेस)

८१- मुरजी पटेल (भाजप)- संदीप नाईक (शिवसेना)