सीएसएमटी स्थानकातील पादचारी पुलावर चाचणी

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर जाग आलेल्या रेल्वे प्रशासनाने पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेच्या पादचारी पुलांवरही क्षमतेपेक्षा अधिक गर्दी होताच ती टिपून रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षाला सतर्क करणारे वैशिष्टय़पूर्ण कॅमेरे (व्हिडीओ अ‍ॅनेलिटिकल) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या यंत्रणेची चाचणी प्रथम सीएसएमटी सारख्या गजबजलेल्या स्थानकावरील पादचारी पुलांवर घेण्यात येणार आहे. सध्या रेल्वेत कार्यरत असलेल्या कॅमेऱ्यांत ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यास दादर, कुर्ला, परळ, ठाणे आदी गर्दीच्या ठिकाणच्या कॅमेऱ्यांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल.

पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या गेल्या काही वर्षांत खूपच वाढली आहे. त्या तुलनेत गाडय़ांची संख्या, पादचारी पूल, फलाटाची लांबी-रुंदी वाढलेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रवाशांना गर्दीच्या वेळी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. गर्दीमुळे पादचारी पुलांवरून उतरताना आणि चढताना तर बराच वेळ जातो. अशावेळी गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेच्या पादचारी पुलावर रेल्वे सुरक्षा दलाचे जवानही नसतात. एल्फिन्स्टन रोड स्थानकातील दुर्घटनेनंतर हाच मुद्दा अधोरेखित झाला. त्यामुळे जवानांना तैनात करण्याबरोबरच गर्दी नियंत्रित करण्यासाठी अन्य मार्गाचा अवलंब रेल्वेकडून करण्यात येत आहे.

याचाच एक भाग म्हणून सर्वप्रथम पश्चिम रेल्वेने पादचारी पूल किंवा फलाटांवर प्रमाणापेक्षा गर्दी होताच ती गर्दी टिपून नियंत्रण कक्षाला माहिती देणारी वैशिष्टय़पूर्ण सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. परंतु, पश्चिम रेल्वेवर यंत्रणा कार्यान्वित होण्याआधीच मध्य रेल्वेवर हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ‘प्रथम सीएसएमटी स्थानकात ‘व्हिडीओ अ‍ॅनॅलिटिकल’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातच त्याप्रमाणे बदल केले जाणार आहेत. येत्या एक ते दोन दिवसांत त्याची चाचणी घेण्यात येईल. सीएसएमटी स्थानकातील कल्याण दिशेला असणाऱ्या पादचारी पुलावरील दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. चाचणी यशस्वी होताच दादर, परेल, कुर्ला, ठाणे व अन्य काही गर्दीच्या स्थानकातील सीसीटीव्हीतही त्यानुसार बदल केले जातील,’ असे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कॅमेऱ्यांद्वारे सूचना

  • पादचारी पूल किंवा फलाटाच्या क्षमेतपेक्षा जास्त गर्दी होताच हे कॅमेरे रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षाला सतर्क करतील. कक्षात धोक्याची सूचना देणारा अलार्म वाजेल. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाला तात्काळ घटनास्थळी पाठविले जाईल.
  • साधारण एक वर्षांपूर्वी मध्य रेल्वेवरील काही स्थानकांतील ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत गर्दी टिपणारी यंत्रणा कार्यान्वित केली होती. परंतु ती यंत्रणा तितकीशी कार्यक्षम नव्हती. थोडीफार गर्दी होताच कॅमेरे रेल्वे नियंत्रण कक्षाला सतर्क करत. त्याचा मोठा मनस्ताप जवानांना होत होता. मात्र आता पुन्हा या यंत्रणेत मोठे बदल करून ती कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे.

यशस्वी प्रयोगानंतर अंतिम निर्णय

सध्याच्या घडीला मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांत एकूण दोन हजार ९६० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यातील ९४६ कॅमेरे रेल्वे मंत्रालयाच्या इंटिग्रेटेड सिक्युरिटी यंत्रणेंतर्गत बसविण्यात आले आहेत. तर उर्वरित सीसीटीव्ही कॅमेरे भाडेतत्त्वावर आहेत. प्रयोग यशस्वी झाल्यास रेल्वेच्या ९४६ कॅमेऱ्यांपैकी किती कॅमेऱ्यांत बदल करावेत, हे सीएसएमटीतील चाचणीनंतरच ठरेल.