संदीप आचार्य
साहेब, आम्हाला करोनाची भिती वाटत नाही तर कर्करोगावर उपचार कधी मिळणार याच्या चिंतेत आम्ही आहोत…गेले आठवडाभर दादरच्या गाडगेबाबा धर्मशाळेत कर्करोग शस्त्रक्रियेसाठी थांबलेल्या तपन दास या २८ वर्षांच्या तरुणाचे हे उद्गार अस्वस्थ करणारे होते. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कर्करोगावर उपचार मिळावे यासाठी देशभरातून गाडगेबाबा धर्मशाळेत निवासासाठी आलेल्या कर्करुग्णांची व त्यांच्याबरोबरील नातेवाईकांची ही कहाणी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आदी राज्यामधून रोजच्या रोज गाडगेबाबा धर्मशाळेत एका आशेने हे रुग्ण येत असतात. याशिवाय धर्मशाळेत जागा मिळावी म्हणून किमान २५ दूरध्वनी तरी वेगवेगळ्या राज्यांमधून येतात असे धर्मशाळेचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांनी सांगितले. धर्मशाळेत रुग्ण व नातेवाईक मिळून ७५० लोकांची निवासाची व्यवस्था आहे. सध्या २२० रुग्ण व त्यांच्याबरोबरील नातेवाईक मिळून ७५० लोक धर्मशाळेत राहत आहेत. याशिवाय बाहेरून आलेल्या कोणालाही येथे राहण्यापासून आम्ही अडवत नसल्याने आवारातील मोकळ्या जागेतही रुग्णांच्या नातेवाईकांची व्यवस्था आम्ही केल्याचे प्रशांत देशमुख म्हणाले. करोनाच्या पहिल्या लाटेत यातील बऱ्याच रुग्णांच्या नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता हे रुग्ण थांबू शकत नाहीत. कोणाला रेडिएशन उपचार तर कोणाची केमोथेरपी करायची आहे. बाहेरच्या राज्यातून दूरध्वनी येतात तेव्हा मुंबईतील करोना परिस्थिती गंभीर असल्याचे जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा ‘ आता आम्ही करोनाला भित नाही, आम्हाला कर्करोगावर उपचार हवे आहेत. अन्यथा आमचा रुग्ण दगावेल’ असे कळवळून ही मंडळी सांगतात तेव्हा काय बोलावे तेच कळत नाही, असे देशमुख म्हणाले.

देशभरातून हजारो कॅन्सर रुग्ण मुंबईतील परळ येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचारासाठी येत असतात.वर्षाकाठी जवळपास ७५ हजाराहून अधिक कॅन्सर रुग्णांवर टाटा हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी, रेडिएशन किंवा शस्त्रक्रिया केल्या जातात. बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंड पासून देशाच्या कानाकोपऱ्यातून येणार्या रुग्णांसाठी दादर येथील दादासाहेब फाळके मार्गावरील ‘संत गाडगेबाबा धर्मशाळा’ हे एक मंदिर बनले आहे. देशभरात करोना पसरला आणि लॉकडाउन जाहीर झाला तेव्हा एप्रिल व मे महिन्यात उपचारानंतर धर्मशाळेत अडकलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना गाडगेबाबा धर्मशाळा व्यवस्थापनाने रुग्णवाहिकेतून सुरक्षितपणे त्यांच्या घरी सोडण्याचेही काम केले होते. आजही धर्मशाळेच्या माध्यमातून ही सेवा सुरुच आहे. येथे येणाऱ्या रुग्णांना सकाळची नाश्ता, हळदीचे दुध, फळे, दुपारी व रात्रीचे जेवण मोफत दिले जाते. याशिवाय आता टाटा कॅन्सर हॉस्पिटल मधून उपचार करून परत आलेल्या रुग्णाला प्रोटीन पावडर व थेप्टीनची बिस्किटे दिली जातात.

करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान बहुतेक रुग्णालयांनी अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता अन्य शस्त्रक्रिया थांबवल्या होत्या. टाटा कॅन्सर रुग्णालयानेही शस्त्रक्रिया कमी केल्या होत्या. यावेळी मात्र टाटा कॅन्सर रुग्णालयाने शस्त्रक्रिया व एकूण उपचाराचे प्रमाण वाढवले आहे. वाढता करोना लक्षात घेऊन योग्य ती सावधगिरी बाळगून वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कर्करुग्णांवर उपचार सुरु आहेत. टाटा कॅन्सर रुग्णालयातील उपचाराबाबत असलेल्या विश्वासातून करोनाची चिंता न करता आज देशभरातून रुग्ण उपचारासाठी मुंबईत येत असून गाडगेबाबा धर्मशाळा हीच या रुग्ण व नातेवाईकांचा आधार आहे. १९८४ साली संत गाडगेबाबा धर्मशाळा सुरु झाली. आज करोनाच्या कठीण काळातही आमचे सर्व कर्मचारी शंभर टक्के काम करत आहेत. मी स्वत: कुटुंबासह येथे राहात असून येथे येणार्या कोणत्याही रुग्णाला परत पाठवले जात नाही. अडचण असेल तर तात्पुरती कार्यालयात तसेच आता आवारातही व्यवस्था करतो, असे प्रशांत देशमुख म्हणाले. करोनाच्या काळात पश्चिम बंगाल, युपी, बिहार व झारखंड येथून आलेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. सुदैवाने संस्थेला दानशूर लोकांची कमतरता कधीच भासली नाही. त्यामुळेच उत्तम जेवणा बरोबर आज आम्ही हळदीचं दूध व फळे रुग्णांना देऊ शकतो. अनेक दानशूर लोकांनी रोजच्या जेवणाची जबाबदारी उचलली आहे. म्हणजे त्यासाठी लागणारे पैसे ही मंडळी देतात. त्यामुळे २०२३ पर्यंतच्या जेवणाच्या तारखा बुक झाल्याचे त्यांनी सांगितले. गाडगेबाबा धर्मशाळेत खोलीसाठी ७० रुपये रोज व हॉलमध्ये राहाण्यासाठी ५० रुपये आकारले जातात. यातच नाश्ता व दोन्ही वेळच्या जेवणाचाही समावेश आहे. अनेक रुग्णांकडे तेही पैसे नसतात, अशांसाठीही दानशूर लोक नेहमीच पुढाकार घेऊन त्यांचे पैसे भरतात.

करोनाची दुसरी लाट हे आमच्यासाठी आव्हान आहे. कर्माचार्यांची तसेच रुग्ण व नातेवाईकांची सुरक्षितता याची काटेकोर काळजी आम्ही घेतो, असे प्रशांत देशमुख म्हणाले. अश्विन मेहता, डॉ. जी. बी. परुळेकर व बापुसाहेब देशमुख हे ८० वयापुढील विश्वस्त या संस्थेचे आधारस्तंभ आहेत. येथे रोज किमान बाराशे लोकांच्या जेवणाची व्यवस्था, स्वच्छता, उपचारासाठी रुग्णालयात जाण्यासाठी मदत अशा एक ना दोन अनेक जबाबदारी होत्या पण गाडगेबाबांच्या शिकवणुकीमुळे चोखपणे पार पाडल्या जात असल्याने देशभरातून मुंबईत उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी गाडगेबाबा धर्मशाळा हे एक मंदिर बनले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cancer patients staying in gadgebaba dharmshala waiting for treatment sgy
First published on: 20-04-2021 at 15:49 IST