राज्यातील फडणवीस सरकारवर सध्या रोकड समस्येचे संकट ओढवले आहे. त्यासाठी शिर्डी देवस्थान संस्थान ट्रस्टने मदतीचा हात पुढे केला आहे. शिर्डीच्या ट्रस्टने ५०० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज सरकारला देऊ केल्याचे वृत्त नवभारत टाइम्सने दिले आहे. निळवंडे येथील सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी ही मदत देण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे. या योजनेमुळे अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांची पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. शिर्डी देवस्थान ट्र्स्टचे अध्यक्ष आणि भाजपा नेते सुरेश हावरे यांनी राज्य सरकारला सिंचन योजनेसाठी कर्ज मागितल्यानंतर परवानगी दिली आहे.

विशेष म्हणजे सरकारला इतक्या मोठ्या प्रमाणावर कोणत्याही देवस्थानने यापूर्वी बिनव्याजी कर्ज दिले नव्हते. इतकेच नव्हे तर या कर्जाच्या परतफेडीसाठी कोणताही कालावधी निश्चित करण्यात आलेला नाही. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका बैठकीद्वारे या कर्जाचा प्रस्ताव मंजूर केला होता, त्यानंतर काल, शनिवारी (दि.१) कर्जाची रक्कम अदा करण्याचे निर्देश देण्यात आले.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, साईबाबा मंदिर ट्रस्ट आणि गोदावरी-मराठवाडा सिंचन विकास महामंडळाने यासाठी सहमती पत्रावर सह्या केल्या आहेत. मंदिराच्या इतिहासातील ही विशेष बाब आहे. निळवंडे सिंचन प्रकल्प बऱ्याच काळापासून रखडला आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे १२०० कोटी रुपये आहे. त्यासाठी मंदिर ट्रस्ट ५०० कोटी रुपये देणार आहे.

या प्रकल्पासाठी जलसिंचन विभागाकडून यंदाच्या बजेटमध्ये ३०० कोटींची तरतूद केली आहे. तर पुढील वर्षासाठी ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, दोन वर्षात या प्रकल्पातील कालव्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची आशा आहे. गेल्यावर्षीही मंदिर ट्रस्टने या प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपये सरकारला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी या कर्जाचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. या प्रकल्पामुळे अहमदनगर जिल्ह्यातील अकोला, संगमनेर, राहुलरी, कोपगाव आणि शिर्डी या गावांना फायदा होणार आहे.