बँकांचे कोट्यवधी रुपयांचे थकीत कर्ज बुडवून विदेशात फरार झालेला उद्योजक विजय मल्ल्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने मनी लॉन्ड्रींगप्रकरणी मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. काही दिवसांपूर्वीच मल्ल्याला न्यायालयाने फरार घोषित केले होते.

मल्ल्याने विविध बँकांचे तब्बल ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवले आहे. मनी लॉन्ड्रींगप्रकरणी आज मुंबईतील विशेष न्यायालयाने मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. सीबीआयने मल्ल्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यावर आज विशेष न्यायालयात सुनावणी झाली. भारतातून लंडनमध्ये फरार झालेल्या मल्ल्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आता सीबीआय हे वॉरंट इंग्लंडला पाठवून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी आग्रह करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

तत्पूर्वी स्टेट बँकेने ६३ कर्जदारांचे ७०१६ कोटी रुपयांचे कर्ज बुडाल्याचे मानले होते. या ६३ कर्जदारांमध्ये विजय मल्ल्याही होता. मल्ल्यावर विविध बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. सध्या मल्ल्या परदेशात पसार झाला आहे. या प्रकरणी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी स्पष्टीकरण दिले होते. कर्ज माफ केल्यावरून विरोधकांनी टीका केल्यानंतर राईट ऑफ म्हणजे कर्ज माफ केले असे होत नाही, असे जेटली यांनी स्पष्ट केले होते. अलिकडेच भारताने ब्रिटनच्या प्रधानमंत्री थेरेसा मे या भारत दौऱ्यावर असताना मल्ल्यासह ६० जणांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती.