अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. कालच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला.

सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवून तपासात सहकार्य करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिल्या. त्यानंतर आता सीबीआयचे पथक सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे.

सीबीआय पथक सुशांतसिंह राजपूत प्रकरणाशी संबधित कागदपत्रे वांद्रे पोलिसांकडून ताब्यात घेण्याची शक्यता आहे. हे पथक घटनास्थळाची पाहणीही करण्याची शक्यता आहे.

याप्रकरणी बिहार पोलिसांनी मुंबईत येऊन गोळा केलेले पुरावे सीबीआयने आधीच ताब्यात घेतले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे पथक मुंबई पोलिसांकडून घटनास्थळाच्या पंचनाम्यापासून संभाव्य साक्षीदारांच्या जबाबांपर्यंत सर्व कागदपत्रे ताब्यात घेणार आहे. यात सुशांतचे शवचिकित्सा अहवाल, न्यायवैद्यक प्रयोग शाळेने केलेला तपास, सीसीटीव्ही चित्रण, कॉल डेटा रेकॉर्डचाही समावेश असेल.

१४ जूनला सुशांत वांद्रे येथील निवासस्थानी मृतावस्थेत आढळला होता. वांद्रे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत आतापर्यंत ५६ जणांचे जबाब नोंदवले. सुशांतला मानसिक विकार होता, चित्रपटसृष्टीतील घराणेशाही किंवा अन्य व्यावसायिक, वैयक्तिक कारणामुळे तो निराश होता आणि त्यातून त्याने आत्महत्या केली असावी, या अंदाजाने मुंबई पोलिसांनी चौकशी पुढे सुरू ठेवली होती. मात्र बिहार पोलिसांनी सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपांनुसार अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिच्या कुटुंबियांभोवती तपास केंद्रित केला. या दोन्ही यंत्रणांनी केलेली चौकशी, तपास समोरासमोर ठेवून सीबीआय पथक व्यूहरचना ठरवेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.