व्हिडियोकॉनप्रकरणी चौकशी संपेपर्यंत पदमुक्त; संदीप बक्षी यांच्याकडे हंगामी कारभार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडियोकॉन कर्जवाटप प्रकरणासंबंधी अंतर्गत चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्य कार्यकारी चंदा कोचर या बेमुदत रजेवर राहतील अशी घोषणा करतानाच, आयसीआयसीआय बँकेने मुख्य परिचालन अधिकारी म्हणून संदीप बक्षी यांच्या नियुक्ती करीत असल्याचे सोमवारी जाहीर केले. बक्षी हेच बँकेचा सर्व व्यावसायिक कारभार पाहतील. त्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी आहे.

सध्या समूहातील आयुर्विमा कंपनी म्हणजे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी पाहात असलेले संदीप बक्षी हे मंगळवारपासूनच बँकेतील नवीन पदभाराची सूत्रे हाती घेतील. तर ३० मे २०१८ रोजी म्हणजे अंतर्गत चौकशीचा निर्णय जाहीर झाल्यासरशी बेमुदत  रजेवर गेलेल्या चंदा कोचर या ही चौकशी पूर्ण होईपर्यंत कार्यालयापासून दूरच राहतील, याची आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कोचर सोमवारच्या बैठकीलाही उपस्थित नव्हत्या.

चंदा कोचर यांनी व्हिडियोकॉन समूहाला कर्ज देताना आपल्या कुटुंबीयांचे हितसंबंध सांभाळले असा त्यांच्यावर आरोप असून, त्याची सध्या चौकशी सुरू आहे. सार्वत्रिक चर्चा होती त्याप्रमाणे कोचर यांची पदावरून उचलबांगडीचा निर्णय सोमवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीतून पुढे आलेला नाही. ‘त्या नियोजित रजेवर असून, बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कायम राहतील’, असे बँकेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. त्यांच्या अनुपस्थितीत आयसीआयसीआय बँकेचे सर्व कार्यकारी संचालक आणि व्यवस्थापकीय अधिकारी हे बक्षी यांच्याकडे आपल्या कार्याचा अहवाल देतील. तर बक्षी हे संचालक मंडळाला उत्तरदायी असतील. बक्षी यांच्या जागी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एन. एस. कन्नन यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanda kochhar videocon
First published on: 19-06-2018 at 02:13 IST