शिवसेनेचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील वाद मिटला असून, या दोन्ही नेत्यांमध्ये अखेर मनोमिलन झालं आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीनंतर या दोन्ही नेत्यांनी अखेर हातात हात घेत, वाद संपुष्टात आल्याचे दाखवले.

या बैठकीस चंद्रकांत खैरे व अब्दुल सत्तार यांच्याशिवाय शिवसेना नेते नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, आमदार अंबादास दानवे यांची उपस्थिती होती.

पक्षप्रमुखांनी सांगितलं आहे की, कालपर्यंत झालेला विषय संपलेला आहे. इथुन पुढे पक्ष शिस्त व पक्षाचा आदेश मानून पक्षाने जी चौकट आखून दिली आहे, त्यामध्ये काम करा. चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश मान्य केला आहे व मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील पक्षप्रमुखांना शब्द दिला आहे की, आमच्याकडून तुम्हाला त्रास होईल, असं काम कुठल्याही परिस्थितीत होणार नाही. दोघांमधील सर्व गैरसमज दूर झाले आहेत. असं एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलं आहे.

अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं काहीही घडलं नव्हतं, याची अफवा एवढी पसरली की विरोधकांनी यावरून उलटसुलट चर्चा सुरू केल्या होत्या. मात्र असा कुठलाही प्रकार घडलेला नाही. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोरे या सर्व गोष्टींवर पडदा पडलेला आहे. कालपर्यंत घडलेल्या सर्व घटना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून देखील माहिती आहे. या सर्व गोष्टींची चर्चा झालेली आहे. आता दोघांनी पक्षाची शिस्त पाळून एकत्र काम करण्याचं ठरवलेलं आहे. आता कोणताही वाद नाही व कुठलेही मतभेद नाहीत. खैरे हे शिवसेनेचे नेते आहेत व अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे मंत्री आहेत. ते एकमेकांना विश्वासात घेऊन काम करतील, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

वाद मिटलेला आहे, आगामी निवडणुकांमध्ये सोबत काम करणार –
वाद मिटलेला आहे, उद्धव ठाकरे यांच्यासमोर बरीच चर्चा झाली. एकनाथ शिंदे, अनिल देसाई यांची देखील बैठकीस उपस्थिती होती. ते माझे मंत्री आहेत व मी त्यांचा शिवसेनेचा नेता आहे. त्यामुळे आम्ही पक्षाची शिस्त योग्यिरित्या पाळणार आहोत.आगामी निवडणुकांमध्ये आम्ही हाताहात घेऊन काम करू, अशी चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांना यावेळी प्रतिक्रिया दिली.

मातोश्रीवरील निर्णयाचे तंतोतंत पालन केले जाईल –
चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे नेते आहेत, मी मंत्री आहे. दोघांमधील गैरसमजांमुळे ज्या काही घटना घडल्या आहेत, त्या यापुढे होणार नाहीत. मातोश्रीवर घेतलेल्या निर्णयाचे तंतोतंत पालन केले जाईल. यानंतर कुठेही अशापद्धतीचा वाद होणार नाही, याची दक्षता आम्ही निश्चित घेऊ. असं राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांना सांगितलं आहे.