News Flash

मुंबई महापालिकेच्या वर्क ऑर्डरमध्ये ६ कोटींचा घोटाळा; चंद्रकांत पाटील यांचा खळबळजनक आरोप

"११ कोटींच्या वर्क ऑर्डर तब्बल ६ कोटींचा घोटाळा"

राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यापासून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत रुग्णांची संख्या मोठी आहे. सध्याही मुंबईतील रुग्णसंख्येची वाढ झपाट्यानं होत आहे. राज्य सरकार व मुंबई महापालिकेच्या वतीनं करोना प्रसार रोखण्याबरोबर रुग्णांच्या उपचारासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचं दिसून येत असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेनं काढलेल्या वर्क ऑर्डरमध्ये ६ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. “मुंबईत करोनानं प्रचंड थैमान घातलं आहे. मुंबईची परिस्थिती दिवसेंदिवस नियंत्रणाबाहेर चालली आहे. एवढे मोठे संकट असताना मुंबईतील प्रशासन हे भ्रष्टाचार करण्यात मग्न आहे. गोरेगाव येथील नेस्को मैदानावर करोनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. कोविड सेंटरसाठी लागणाऱ्या तब्बल २३ वस्तूची ११ कोटी रुपयांची वर्क ऑर्डर महापालिकेनं काढली असून, त्यात तब्बल ६ कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. कोविड सेंटरचं काम कंपन्यांच्या सीएसआर फंडातून होणार असल्याचं महापालिकेनं सुरूवातीला सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात महापालिकेनं त्यासाठी ११ कोटी रूपयांची वर्क ऑर्डर दिली असल्याचं उघडकीस आलं आहे. कोविड सेंटरसाठी लागणाऱ्या वस्तू या ३ महिने भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. मात्र त्यासाठी मोजलेली रक्कम ही त्या वस्तूंच्या प्रत्यक्ष किंमतीपेक्षा जास्त असल्याचे उघडकीस आले.”

उदाहरणार्थ –

“२ हजार उभे फॅन हे १ कोटी ८० लाख रुपयांनी भाड्यानं घेतले मात्र, त्याची बाजारातील किंमत ही ७० लाख रुपये एवढी आहे. ८० सीसीटीव्ही हे ५७ लाख ६० हजार रुपयांनी भाड्याने घेतले, मात्र याची बाजारातील किंमत ही ८ लाख रूपये एवढी आहे. एकीकडे रुग्णसंख्या आटोक्यात येत नसताना, रोज कित्येक निष्पाप लोकांचे प्राण जात असताना मुंबई महानगरपालिका प्रशासन मात्र जनतेचे पैसे लुबाडण्यात मग्न आहे. एक माणूस म्हणून एवढ्या खालच्या पातळीला कसे कोण जाऊ शकते? सत्ताधारी यावर तरी कारवाई करणार का? प्रशासनाच्या कारभारात जे चालू आहे ते खरंच खूप धक्कादायक आहे,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 5:45 pm

Web Title: chandrakant patil corruption allegations against bmc six crore fraud in bmc work order bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोना कालीन दंतोपचारात पोकेमॉन- मिकी माऊसचे योगदान!
2 Coronavirus  : मुंबईतील बाधितांची संख्या ७३,७४७
3 अकरावीच्या प्रवेशावेळी यंदा वादाची चिन्हे
Just Now!
X