उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी मुंबई दौऱ्यावर येणार असून यावेळी काही उद्योजक तसंच बॉलिवूड सेलिब्रेटींची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशात उभारण्यात येणाऱ्या फिल्मसिटीसंबंधी योगी आदित्यनाथ यावेळी चर्चा करणार असून गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करणार आहेत. यावरुनच आता राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोपांचा फैरी झडू लागल्या आहेत. मुंबईमधील चित्रपट उद्योगाला आकर्षित करण्याचा योगी आदित्यनाथ यांचा विचार असून महाराष्ट्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी हा डाव असल्याचं काही राजकीय जाणकारांचं मत आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी कोणीही मुंबईमधून बॉलिवूड हलवू शकत नाही असं म्हटलं आहे.

बुधवारी मुंबई दौऱ्यावर येणारे योगी आदित्यनाथ काही बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासंबंधी चर्चा करणार आहेत. योगी आदित्यनाथ उद्योजक आणि बॉलिवूड सेलिब्रेटींना उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करतील. या बैठकीत दिग्दर्शक सुभाष घई, बोनी कपूर, टी सीरिजचे भूषण कुमार, झी स्टुडिओचे जतीन सेठी, नीरज पाठक, रणदीप हुडा, तिगमांशू धुलिया, जिमी शेरगिल, तरण आदर्श, कोमल नाहता आणि राजकुमार संतोषी उपस्थित राहतील अशी माहिती अधिकाऱ्याने फ्री प्रेस जर्नलला दिली आहे. याचसंदर्भात प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील यांनी, “बॉलिवूड किंवा असा कुठलाही उद्योग ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात उद्योगनिर्मिती होतेय तो कुठेही नेण्याचं काही कारण नाही. एखादे वेळेस ते अशाच प्रकारचा उद्योग आपल्या राज्यात सुरु करावा यासंदर्भातील अभ्यास करण्यासाठी येत असतील,” असं मत व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा- “कितीही प्रयत्न केला तरी…,” मुंबई दौऱ्यावर येणाऱ्या योगी आदित्यनाथांना सुप्रिया सुळेंचा इशारा

योगी यांचा मुंबई दौरा आणि बॉलिवूडसंदर्भातील चर्चांवर पुढे बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, “मुंबईतील बॉलिवूड ते (योगी) बाहेर नेऊ शकत नाहीत. मुंबईचं जे आकर्षण आहे तसेच मुंबईतील ज्या सुविधा आहेत त्या अन्य राज्यांमध्ये मिळणंही अवघड आहे. पण सुविधा उपलब्ध करुन त्यांनी अशी एखादी पर्यायी व्यवस्था उभारली तर आक्षेप असण्याचं काही कारण नाही,” असंही मत व्यक्त केलं.

सप्टेंबर महिन्यात योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या फिल्म सिटीची घोषणा केली होती. देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज असून आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार असल्याचं ते म्हणाले होते. योगी आदित्यनाथ यांनी फिल्मसिटी उभारण्यासाठी नोएडा जवळील यमुना एक्स्प्रेसवेवर असणारी १००० एकर जागाही राखून ठेवली आहे. ही फिल्मसिटी बॉलिवूडपेक्षाही मोठी असेल असं योगी आदित्यनाथ यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली होती. “बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता.