अंतिम वर्षांच्या परीक्षांप्रमाणेच आता मुंबई विद्यापीठाच्या चालू शैक्षणिक वर्षांतील सत्र परीक्षाही ऑनलाइन होणार आहेत. मात्र, अंतिम वर्षांच्या निकालातील अवाजवी गुणवाढीमुळे आता प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात बदल करण्यात आले आहेत. व्यावसायिक आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांची परीक्षा बहुपर्यायी आणि विश्लेषणात्मक अशा दोन्ही स्वरूपांत होणार आहे. या परीक्षा डिसेंबर आणि जानेवारीत होतील.

गेल्या शैक्षणिक वर्षांतील अंतिम वर्षांच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर ऑनलाइन घेण्यात आल्या. घरी बसून परीक्षा देण्याची मुभा, बहुपर्यायी प्रश्नपत्रिका, महाविद्यालयांकडून पुरवण्यात आलेले प्रश्नसंच यामुळे अंतिम वर्षांचे निकाल २५ ते ३० टक्क्यांनी वाढले. विधि विद्याशाखेत शेकडो विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले. या सर्वावरून धडा घेत विद्यापीठाने सत्र परीक्षेचे स्वरूप बदलले आहे. सत्र परीक्षा ऑनलाइनच होणार असली तरी प्रश्नपत्रिका फक्त बहुपर्यायी असणार नाहीत. प्रश्नांची संख्याही वाढवण्यात आली आहे. विधि, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुकला, एमसीए, आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम यासाठी बहुपर्यायी आणि विश्लेषणात्मक प्रश्न अशा दोन्ही स्वरूपांत परीक्षा घेण्यात येणार आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांची परीक्षा बहुपर्यायीच राहणार असून प्रश्नांची संख्या वाढणार आहे.

परीक्षा महाविद्यालयाकडेच

अंतिम वर्षांच्या परीक्षांचे नियोजन महाविद्यालयांच्या समूहाकडे देण्यात आले होते. त्याचप्रमाणे सत्र परीक्षांचे नियोजनही महाविद्यालयांकडे सोपवण्यात आले आहे. विद्यापीठाने ढोबळ आराखडा दिला असून प्रश्नपत्रिका काढणे, वेळापत्रक तयार करणे हे सर्व महाविद्यालयांच्या स्तरावर करण्यात येणार आहे. परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याची सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिली आहे. परीक्षेचे मूल्यांकन ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून, शिक्षकांनी महाविद्यालयात बसूनच मूल्यांकन करावे अशी सूचनाही विद्यापीठाने दिली आहे.

परीक्षा कधी?

– अंतर्गत मूल्यमापन करून त्याचे गुण विद्यापीठाकडे सादर करण्यासाठी २४ डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे.

– प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा १० डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.

– पारंपरिक पदवी अभ्यासक्रम आणि व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा ३१ डिसेंबरपूर्वी होणार आहे.

– व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ जानेवारीपूर्वी होणार आहेत.

– प्रथम वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रम आणि सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत.

सत्र परीक्षा कशी होणार?

* पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी (कला, विज्ञान, वाणिज्य) ६० गुणांची बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असेल. एकूण ५० प्रश्न विचारण्यात येणार असून एका तासात विद्यार्थ्यांने त्यातील ४० प्रश्न सोडवायचे आहेत.

* अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, एमसीए या अभ्यासक्रमांची ४० गुणांचे बहुपर्यायी प्रश्न आणि ४० गुणांचे विश्लेषणात्मक प्रश्न अशी एकूण ८० गुणांची परीक्षा असेल. बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेसाठी एक तास आणि विश्लेषणात्मक प्रश्नपत्रिकेसाठी एक तास अशी एकूण दोन तासांची परीक्षा असेल.

* वास्तुकला शाखेसाठी ४० गुणांची बहुपर्यायी प्रश्नपत्रिका आणि ८० गुणांची ‘डिझाइन’ या विषयावरील प्रश्नांची परीक्षा असेल. प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी १ तास देण्यात येईल.

* विधि आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमासाठी ३० गुणांची बहुपर्यायी प्रश्नपत्रिका आणि ३० गुणांची विश्लेषणात्मक प्रश्नपत्रिका अशी एकूण ६० गुणांची परीक्षा होईल. बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेसाठी अर्धा तास तर विश्लेषणात्मक प्रश्नपत्रिकेसाठी १ तासाचा वेळ देण्यात येईल. विश्लेषणात्मक प्रश्नपत्रिकेत १० प्रश्न विचारण्यात येतील.