मलबार हिल टेकडीवरील ‘नाझ’ हॉटेलच्या जागेवर पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या ‘प्रमोद नवलकर व्ह्य़ूविंग गॅलरी’तून मरिन ड्राइव्हचा क्विन नेकलेस आणि गिरगाव चौपाटी पाहण्यासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. १६ वर्षांवरील व्यक्तींसाठी २० रुपये, तर १६ वर्षांवरील परदेशी पर्यटकांसाठी ५० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. आतापर्यंत पर्यटकांना या गॅलरीत विनाशुल्क प्रवेश देण्यात येत आहे.

मलबार हिल येथील पालिकेचा पाणी नियंत्रण कक्ष असून तेथील जागा ‘नाझ’ हॉटेलला भाडेपट्टय़ाने देण्यात आली होती. हा भाडेपट्टय़ाचा करार १९९९ मध्ये संपुष्टात आल्यानंतर पालिकेने हा भूखंड ताब्यात घेतला. समुद्रसपाटीपासून ५४ मीटर उंचीवर असलेल्या या भूखंडावर पालिकेने ‘प्रमोद नवलकर गॅलरी’ उभारली. या चार मजली वास्तूच्या पहिल्या मजल्यावर अत्याधुनिक मलबार हिल नियंत्रण कक्ष, दुसऱ्या मजल्यावर दर्शनीय मनोरा आणि तिसऱ्या मजल्यावर दुर्बिणीतून पाहण्यासाठी मनोरा उभारण्यात आला आहे. या गॅलरीतून गिरगाव चौपाटी, मरिन ड्राइव्ह व अरबी समुद्राचे दर्शन घडते. या वास्तूचे १० ऑक्टोबर २०१८ रोजी लोकार्पण करण्यात आले. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये शाळांच्या सहली येथे येत असतात. त्यामुळे हा परिसर गजबजून जातो. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी प्रमोद नवलकर व्ह्य़ूविंग गॅलरीला १५००, तर इतर दिवशी अंदाजे एक हजार पर्यटक भेट देत असतात. गॅलरीस भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी उद्वाहनाचे चालवणे, दुर्बिणीद्वारे पर्यटकांना विविध वास्तूंचे दर्शन घडवणे, गर्दीचे व्यवस्थापन करणे आदी विविध कामांसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

या वास्तूमध्ये विविध सुविधा उपलब्ध करणे आणि देखभाल यावर पालिकेला मोठा खर्च सोसावा लागणार आहे. त्यामुळे ‘प्रमोद नवलकर व्ह्य़ूविंग गॅलरी’साठी प्रवेश शुल्क आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाने हा प्रस्ताव विधि समितीच्या पटलावर सादर केला आहे. विधि समितीकडून यावर कोणता निर्णय घेण्यात येतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

शुल्क कसे?

* गॅलरीला भेट देणाऱ्या १६ वर्षांवरील व्यक्तीसाठी २० रुपये, तर १६ वर्षांवरील परदेशी नागरिकासाठी ५० रुपये प्रवेश शुल्क आकारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.

* या गॅलरीमध्ये १६ वर्षांखालील मुलांना, ६० वर्षांवरील वृद्धांना, सहलीसाठी येणारे पालिका शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक, अन्य शाळांमधील १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना, अपंग व्यक्तींना विनाशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे.