इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) घेण्यात येणारी सनदी लेखापाल (सीए) परीक्षा आता १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

सनदी लेखापाल परीक्षा वर्षांतून दोन वेळा घेण्यात येते. त्यानुसार संस्थेने मेमध्ये होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वेळापत्रकात बदल करून ही परीक्षा २९ जुलै ते १६ ऑगस्ट या कालावधीत घेण्याचे नियोजन संस्थेने केले होते. मात्र, त्याला पालकांनी विरोध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सद्य:स्थितीत परीक्षा घेणे कठीण असल्याचे मान्य करून सर्व राज्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे संस्थेने न्यायालयात सांगितले होते. त्यानुसार जुलैमध्ये होणारी ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे.  या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना आता नोव्हेंबरच्या परीक्षेला बसता येणार आहे. ही परीक्षा १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन असून त्यापूर्वी एकदा परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.