न्यायाधीशांनी आरोपीच्या पिंजऱ्यात बोलावल्यानंतर भुजबळांनी ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी आपल्याला चौकशीऐवजी तासन् तास कसे बसवून ठेवले याचा पाढा वाचला. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी मारहाण वा त्रास दिला नाही. परंतु न्यायमूर्ती महोदय ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी आपल्याला चौकशीच्या नावाखाली दिवसभर तासन् तास बसवून ठेवले आणि रात्रीच्या वेळेस अचानक जबाब घ्यायला यायचे, अशी तक्रार केली.
बुधवारी ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी दिवसभर आपल्याला बसवून ठेवले. अखेर कंटाळून मीच त्यांना सायंकाळी चारच्या सुमारास जबाब घेण्याची विनंती केली. मात्र अधिकारी चौकशीसाठी काही फिरकले नाहीत. त्यादरम्यान आपल्याला वैद्यकीय चाचणीसाठी सेंट जॉर्जेस रुग्णालयात नेण्यात आले. तेथे चार तास बसवल्यानंतर तेथून साडेनऊ वाजता जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. तेथेही बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास तुमची चौकशी करायची असल्याचे सांगण्यात आले.