अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला चाळीस दिवस उलटून गेले तरी अजून पोलिसांना मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांबद्दलची स्पष्ट नाराजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या वक्तव्यातून आज उमटली. या प्रकरणाचा वेगाने तपास करुन सूत्रधारांपर्यंत पोहचण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर या प्रकरणाचा मुळापासून छडा लावण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुकूलता दर्शविली असल्याचे सांगण्यात येते. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व इतर पुरोगामी संघटनांच्या वतीने राज्यभर सातत्याने आंदोलने करण्यात येत आहेत. परंतु पोलिसांना अजून गुन्हेगार सापडेलेले नाहीत.
सरकारच्या वतीने किंवा पोलिसांच्या वतीने तपास सुरु आहे, अशीच उत्तरे देण्यात येत आहेत. पोलिसांच्या त्यात गेल्या चाळीस दिवसांत काहीही फरक पडलेला नाही. त्यामुळे सर्व सामान्य जनतेमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गांधी जयंतीदिनी बुधवारी शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस अविनाश पाटील, मुक्ता दाभोलकर, आमदार कपिल पाटील, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आदींचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दाभोलकर हत्याप्रकरणाच्या तपासास होत असलेल्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाचा मुंबई पोलिस, पुणे पोलिस आणि दहशतवादीविरोध पथक तपास करीत आहे. त्यांच्यात समन्वय रहावा आणि तपास वेगाने व्हावा, यासाठी एसआयटी स्थापन करावी अशी विनंती शिष्टमंडळाने केली.