खारघर सेक्टर ३६ येथे उच्च व मध्यमवर्गीयांसाठी बांधण्यात येणाऱ्या एक हजार ३४४ घरांचे दर जाहीर केल्यानंतर या गृहप्रकल्पाच्या जवळच उभारण्यात येणाऱ्या तीन हजार ५९० घरांच्या दुसऱ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे दर शुक्रवारी सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी जाहीर केले. या संकुलातील घरांची कमीत कमी किंमत १९ लाख रुपये असून जास्तीत जास्त किंमत २६ लाख रुपये आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या घरांची सोडत नवीन वर्षांत निघणार आहे. याशिवाय सिडको कल्याण, बदलापूर तालुक्यांत गृहनिर्माण योजना राबविण्याचा विचार करीत असल्याची माहितीदेखील हिंदुराव यांनी दिली.
गेली अनेक वर्षे गृहनिर्माण प्रकल्पांकडे पाठ फिरवलेल्या सिडकोने आता घरे बांधण्याचा निर्धार जाहीर केला असून तीन वर्षांत बारा हजार घरे बांधण्याचे ठरविले आहे. यातील पाच हजार घरे सध्या खारघर सेक्टर ३६ येथे बांधण्याचे काम सुरू आहे. उच्च आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी एक हजार ३४४ घरे बांधली जात आहे. या प्रकल्पाजवळील तीन हजार ५९० घरांपैकी दोन हजार ६६२ घरे अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी आहेत. ही घरे ६२२ चौरस फूट क्षेत्रफळाची आहेत. त्यांची किंमत २६ लाखांपर्यंत जाईल, असे हिंदुराव यांनी स्पष्ट केले. या संकुलात ९८६ घरे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी असून ५०५ क्षेत्रफळाची ही घरे १९ लाख रुपयांना आहेत. उच्च व मध्यमवर्गीयांसाठी बांधलेल्या घरांच्या संकुलात अनेक सुविधा असून दोन वर्षे ग्राहकांना कोणताही सेवा शुल्क द्यावा लागणार नसल्याने या घरांचे दर चौरस फूट सहा हजार रुपयांच्या घरात आहेत, असे सिडकोचे मुख्य अभियंता के. के. वरखेडकर यांनी स्पष्ट केले.