मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोनाच्या परिस्थितीबाबत चर्चा झाली. राज्यात करोनाचे ४० पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. दुर्दैवाने एका रुग्णाचा मृत्यू आहेत. या रुग्णांमध्ये २६ पुरुष आणि १४ महिलांचा समावेश आहे. एका रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे. इतर सगळ्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. बस किंवा ट्रेन रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही. गर्दी न ओसरल्यास आम्हाला कठोर पावलं उचलावी लागतील. जनतेने या विषयाचं गांभीर्य लक्षात आलं आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सोडून इतरांनी दुकानं बंद ठेवावीत. जनेतेने स्वतःहून स्वयंशिस्त पाळावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जनतेने अनावश्यक प्रवास टाळला नाही तर मुंबईची लोकल बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल.

आरोग्याच्या बाबतीतही सगळ्या सूचना आम्ही देण्यात आलेल्या आहेत. सरकारी कार्यालयांना सात दिवसांची सुटी देण्यात आलेली नाही. ५० टक्के उपस्थितीबाबत आम्ही विचार करतो आहोत. सरकारी कर्मचारी कमी उपस्थितीत जास्तीत जास्त काम कसं करु शकतील? याबाबत आम्ही विचारविनीमय करतो आहोत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुंबईची लोकल सात दिवस बंद ठेवावी अशी मागणी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली होती. राज्य सरकारने करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी असा निर्णय घेतला तर मी त्या निर्णयाला पाठिंबा देईन असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. मात्र अशी कोणतीही चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली नसल्याचं आणि लोकल बंद करण्याचा निर्णय झाला नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मात्र गर्दी करुन, आवश्यकता नसताना घराबाहेर पडून आम्हाला नाईलाजास्तव काही निर्णय घ्यायला भाग पाडू नका असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.