कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापेक्षा गेली २६ वर्षे बंद असलेल्या महाविद्यालयीन निवडणुका कायमस्वरूपी बंद कराव्यात, असा विचार सरकारच्या पातळीवर सुरू झाला असून, निवडणुकांच्या विरोधातच मंत्रिमंडळाच्या बैठकीत शनिवारी एकमत झाले.

राज्यात १९९३ पासून बंद असलेल्या महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरू करण्याचा निर्णय भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात घेण्यात आला होता. यानुसार चालू शैक्षणिक वर्षांत या निवडणुका घेतल्या जाणार होत्या. पण विधानसभेची निवडणूक लक्षात घेता महाविद्यालयीन निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. आचारसंहितेच्या काळात महाविद्यालयीन निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेता, या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्याचे तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ऑगस्ट महिन्यात जाहीर केले होते. या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमात सुधारणाही करण्यात आली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाविद्यालयीन निवडणुकांच्या संदर्भातील विधेयक सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यावर चर्चा करण्यात आली. महाविद्यालयीन निवडणुका या खुल्या आणि नि:पक्षपातीपणे होण्याची शक्यता फारच दुर्मीळ झाली आहे.  मोठय़ा प्रमाणावर पैशांचा दुरुपयोग केला जातो. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यापेक्षा या निवडणुका कायमस्वरूपी बंद कराव्यात, अशी मते मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आली.

महाविद्यालयीन निवडणुकांचे बदलते स्वरूप लक्षात घेता, या बंदच कराव्यात, असाच एकूण मंत्रिमंडळाचा सूर होता. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह जयंत पाटील, छगन भुजबळ या मंत्र्यांनी महाविद्यालयीन निवडणुकांच्या संदर्भात चिंता व्यक्त केली. अखेर महाविद्यालयीन निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या संदर्भातील विधेयक अधिवेशनात न मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.

काँग्रेसप्रणीत एन.एस.यू.आय. या विद्यार्थी संघटनेचा नेता ओव्हेन डिसोझा याच्या हत्येनंतर १९९३ पासून राज्यातील महाविद्यालनीय निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. २०१२ मध्ये आघाडी सरकारच्या काळात महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरू करण्याचा विचार झाला होता. पण तो बेतही रद्द करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महाविद्यालयीन निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारने या निवडणुका कायमस्वरूपी बंद करण्याचा विचार सुरू केला आहे.