सुटे मिळवताना सर्वसामान्यांची दमछाक
पाचशे-हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर चलनात नव्याने आलेली गुलाबी रंगाची दोन हजार रुपयांची नोट मोडताना सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. सुरुवातीला बनावट दिसते म्हणून या नोटा कुणी स्वीकारत नव्हते. आता वरची मोड शंभरच्या नोटांत देणे विक्रेत्यांना कठीण होत असल्याने दोन-तीनशे रुपयांच्या खरेदीकरिताही ही नोट मोडताना सर्वसामान्यांच्या नाकीनऊ येते आहे. काळ्या पैसेवाल्यांच्या तिजोरीचा आकार मात्र या नोटेमुळे कमी होणार आहे. किंबहुना अनेकांनी आपली काळी माया या गुलाबी रंगात जमा करण्यास सुरुवातही केली आहे. या गुलाबी नोटेची कडू चव चाखलेल्या काही मुंबईकरांच्या प्रतिक्रिया..
मला बँकेतून दोन हजारांच्या दोन नोटा मिळाल्या, पण त्याचे सुटे करताना नाकीनऊ आले आहेत. १४३० रुपयांची औषधे घेऊनही दुकानदाराने सुटे देण्यास नकार दिला. चिराबाजारमधल्या एका दुकानात किराणा खरेदीचे बिल भरण्यासाठीही नोटा घेतल्या गेल्या नाहीत. पशाअभावी पिशवीत भरलेला माल काढून परत द्यावा लागला. एवढय़ा मोठय़ा मूल्यांच्या नोटा खिशात असूनही नसल्यासारख्याच आहेत. रेल्वे स्टेशनवरही नोटेचे सुटे झाले नाहीत.
* राजेश कारेकर, इलेक्ट्रिशियन, चिराबाजार
आम्ही दोघे नवरा-बायको काम करतो. मी मुलुंडच्या वामनराव मुरांजन शाळेत कंत्राटी तत्त्वावर सुरक्षारक्षक आहे. पत्नी भारती जवळच्या सोसायटीत मुले सांभाळायचे काम करते. माझा पगार दिवाळीलाच संपला. बायकोचा पगार खोलीचे भाडे आणि इतर गोष्टींसाठी तिने घेतला नव्हता. चार-पाच दिवसांपूर्वी तिला पगार मिळाला. यात तीन नव्या दोन हजारांच्या नोटा होत्या. यातील एक नोट पहिल्यांदा घरातला जिन्नस भरण्यासाठी वाण्याकडे घेऊन गेलो. तेथे एवढे सुट्टे नाही मिळणार असे सांगण्यात आले.
शाळेतील एका शिक्षकाने मला या दोन हजारांचे सुटे आणून दिले. तरीपण बायकोच्या पगारातील दोन हजार रुपयांच्या नव्या दोन नोटा शिल्लक असून त्या कशा वापरायच्या, असा प्रश्न मला पडला आहे. मुलाला गावी पाठवायचे आहे. रॉकेल ब्लॅकने घ्यावे लागते. लाइटबिल द्यायचे आहे. सोसायटीचा हप्ता द्यायचा आहे. पण सुटे मिळत नसल्याने खूप त्रास होत आहे.
* सुरेश काशिनाथ वाघ, वय ४४, सुरक्षा रक्षक (आनंदनगर, ठाण्याचे रहिवासी)
माझ्याकडे पाचशेच्या जुन्या आठ नोटा होत्या. त्या माझ्याच बँकेत बदलून घेतल्या तेव्हा मला दोन हजारांच्या दोन नोटा देण्यात आल्या. एक नोट सुटी करण्यासाठी मी डिझेल भरायला गेलो. पण तिथे काही उपयोग झाला नाही. जवळ असलेल्या डेबिट कार्डाने पसे भरले. मग किराणा दुकानात गेलो. तर त्याने सुट्टे पसे आणून माल खरेदी करण्याचा सल्ला दिला. अगदी वाइन शॉपमध्येही सुटे मिळाले नाहीत. तेव्हापासून गेले चार-पाच दिवस दोन हजाराची नोट खिशात आहे. .
* भारत जाधव, वय २८, चर्मकार
मी १७ नोव्हेंबरला राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यातून पाच हजार काढण्यासाठी धनादेश दिला. मात्र, बँकेत खातेदारांना देण्यासाठी फक्त दोन हजाराच्या नोटा आहेत. म्हणून दोनाच्या पटीत रक्कम देण्यासाठी एक तर चार हजार किंवा सहा हजार करा, असे बँक कर्मचाऱ्याने मला सांगितले. मी सहा हजार रुपये लिहून दोन हजाराच्या तीन नोटा घेऊन बाहेर पडलो. मात्र, रोजच्या किरकोळ खरेदीसाठी या दोन हजाराच्या नोटेचा काही उपयोग नाही. दूधवाल्याने ती घेतली नाही. किराणा दुकानदार म्हणाला, दीड हजाराहून अधिक खरेदी केली तर घेतो.
* वीरेंद्र बागूल, वय ६०, बेस्टचे माजी जनसंपर्क अधिकारी
(प्रतिक्रिया संकलन – प्राजक्ता कासले, विनायक सुतार, श्रीनिवास देशपांडे)