कर्नाटक व गोव्यामधून सिंधुदुर्गमार्गे कोकणात शिरलेल्या माकडतापासह स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, चिकुनगुन्या आदी साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यत सुमारे सहा कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. सध्या विषाणुंची चाचणी ही पुण्यातील ‘राष्ट्रीय विषाणू संस्थेत’ (एनआयव्ही) होत असून येथे देशभरातून चाचणीसाठी नमुने येत असल्यामुळे या संस्थेवरील ताण कमालीचा वाढला आहे. यामुळे कोकणात वेगाने पसरू पाहाणाऱ्या माकडतापाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने ‘एनआयव्ही’च्या धर्तीवर अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

‘क्युसनुर फॉरेस्ट डिसिज’ (केएफडी) हा गोचीडीसारख्या किटकांच्या माध्यमातून पसरणारा विषाणुजन्य आजार आहे. कर्नाटकमधील क्यासनुर गावात या आजाराचे रुग्ण सर्वप्रथम आढळून आले असून या आजाराचे विषाणू प्रामुख्याने माकडाच्या शरीरात वाढत असल्यामुळे माकडताप या नावाने हा आजार आढळून येतो. या आजारात ताप, डोकेदुखी तसेच डोळे लाल होणे ही लक्षणे आढळून येत असून गेल्या काही वर्षांत कर्नाटकच्या जंगलातून मोठय़ा प्रमाणात सिंधुदुर्गात आलेल्या माकडांमुळे तेथीही या साथीची लागण होत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन तीन वर्षांत कोकणातही या माकडतापाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून आल्यानंतर आरोग्य विभागाने माकडताप रोखण्यासाठी अनेक उपापयोजना केल्या. तथापि ताप आलेल्या व्यक्तीच्या रक्ताची तपासणी करण्यासाठी नमुने पुण्याच्या एनआयव्ही मध्ये पाठवणे व तेथून अहवाल मिळण्यास लागणारा कालावधी लक्षात घेऊन एकूण कोकणासह राज्यासाठी विषाणुंच्या चाचणीसाठी सुसज्ज प्रयोगशाळा असणे आवश्यक असल्याची भूमिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली.

  • एनआयव्ही’ देशभरातून चाचण्यांसाठी नमुने येत असल्यामुळे निदान होण्यास उशीर होतो. उपचारालाही उशीर होऊ लागल्यामुळे माकडतापाचा सामना करण्यासह स्वाईन फ्ल्यू, कावीळ, डेंग्यू, चिकुनगुन्या, मेदुज्वरसह जंतुसंसर्ग आजारांच्या चाचण्या करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यत ‘रेण्वीय निदान प्रयोगशाळा’ (मॉल्युक्युलर) सुरू केली जाणार आहे.

दोन मजल्यांची सुसज्ज इमारत

आरोग्य विभागाच्या सहा जिल्हा प्रयोगशाळांमध्ये सध्या करण्यात येत असलेल्या चाचण्या या प्रथमिक स्वरुपाच्या असून उच्च न्यायालयानेही आरोग्य विभागाच्या पुणे, औरंगाबाद, नागपूर, सिंधुदुर्ग, नाशिक व अमरावती या सहाही जिल्हा प्रयोगशाळा अत्याधुनिक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यतील प्रयोगशाळेची उभारणी करण्यात येत असून दोन मजल्याची सुसज्ज इमारत त्यात प्रयोगशाळेसह प्रशिक्षण हॉल आदी व्यवस्था व कंत्राटी तत्त्वावर ५७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे साथीच्या आजारांना आळा घालता येईल, असा विश्वास आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी व्यक्त केला.