संदीप आचार्य

पालघर जिल्ह्य़ातील मोखाडा तालुक्यातील तुळ्याचा पाडा व भोयपाडा गावातील आदिवासी शेतकऱ्यांच्या चेहेऱ्यावर आनंद दिसत होता. त्याचे कारणही तसेच होते. कष्टाने केलेला भुईमूग चांगला आला होता. यामागे त्यांचे जसे कष्ट होते तसेच प्रगती प्रतिष्ठानच्या सुनंदा पटवर्धन यांची कल्पकता आणि आधुनिकीकरणाचा आग्रहही होता. सौर विजेच्या माध्यमातून ठिबक सिंचनाद्वारे ५४ एकरावर भुईमुगाची शेती फुलली होती.

प्रगती प्रतिष्ठानच्या सुनंदा पटवर्धन गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ मोखाडा व जव्हारमध्ये आदिवासींच्या विकासासाठी अनेक योजना राबवत आहेत. सुनंदा पटवर्धन यांनी ‘बँक ऑफ अमेरिका’कडून कंपनी सामाजिक दायित्वाच्या (सीएसआर) माध्यमातून एक कोटी ४० लाख रुपयांची मदत मिळवली. या मदतीच्या माध्यमातून मोखाडय़ातील तुळ्याचा पाडा, भोयपाडा, मोरांडासह चार गावांतील १०८ शेतकऱ्यांना एकत्र केले.

या शेतकऱ्यांची चार गावांत मिळून ५४ एकर जमीन होती. सुनंदाताईंनी या शेतकऱ्यांचे दहा गट तयार केले व त्यांच्या माध्यमातून सौर विजेवरील पंपाच्या माध्यमातून ठिबक सिंचनाद्वारे भुईमूग घेतला. प्रत्येक गटासाठी साडेसात व दहा अश्वशक्तीचे पंप बसवून त्यांच्या माध्यमातून तीन तास ठिबक सिंचनाद्वारे भुईमुगाला पाणी दिले. नोव्हेंबरमध्ये ही लागवड करण्यात आली असून साडेचार महिन्यांमध्ये भुईमुगाचे उत्तम पीक हाती आले. सामुदायिक शेतीचा हा प्रयोग करताना कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आधुनिकीकरणाची कास धरल्याचे सुनंदाताईंनी सांगितले.

शेतीला पाणी देण्यासाठी तुळ्याचा पाडा येथील बंधाऱ्याचा वापर करण्यात आला. बंधाऱ्याच्या माध्यमातून साठवले जाणारे पाणी वापरण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे बंधाऱ्यातून पाणी उचलण्याची व्यवस्था शेतकऱ्यांच्या मदतीने प्रथम करण्यात आली. त्यापाठोपाठ सौर ऊर्जापंप बसविण्यात आले. ठिबक सिंचनाचा योग्यप्रकारे वापर करून भुईमुगाचे पीक घेतले. सुमारे १४ क्विंटल पीक हाती आले असून ४२ ते ४५ रुपये किलो दराने भुईमुगाच्या शेंगांची विक्री होईल, असे त्यांनी सांगितले. येत्या १६ मे रोजी जव्हारच्या एकात्मिक प्रकल्प विकास अधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते भुईमूग काढणीचा कार्यक्रम होणार आहे. शेतीतून आदिवासी शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे. गावाबाहेर नोकरी वा व्यवसायासाठी त्याला जावे लागू नये ही तळमळ उराशी बाळगून सुनंदाताई गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मोखाडय़ात पाय रोवून आहेत.