विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणितातील अभ्यासक्रम आखण्याचा मानस

विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांतील आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम आखण्यात येत आहे. आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. शुभाशीष चौधरी यांनी याबाबत गुरुवारी माध्यमांना माहिती दिली. डॉ. चौधरी यांनी गेल्या आठवडय़ात संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांबरोबरच कला विषयांचाही समावेश या आराखडय़ात करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार श्रेयांकाधारित विषय निवडण्याची मुभा या अभ्यासक्रमात मिळणार आहे. ‘ही संकल्पना आता केवळ विचाराधीन असून लवकरच ती प्रत्यक्षात आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे चौधरी यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे इतर अनेक पर्यायी विषयातून एक विषय निवडण्याची मुभा मिळणार आहे. यामुळे साचेबद्ध शिक्षण न घेता विद्यार्थी त्यांच्या आवडीचे शिक्षण घेऊ  शकणार आहेत, असेही चौधरी म्हणाले.आयआयटी मुंबईत सध्या इंजिनीअरिंग व्यतिरिक्त शिकविले जाणारे डिझाइन व्यवस्थापन या विषयांच्या अभ्यासक्रमांनाही मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. यातून संयुक्त अभ्यास तयार होऊ  शकतो, असा विचार असल्याचे उप संचालक प्रा. प्रसन्ना मुजुमदार यांनी सांगितले.

‘जेईई’शिवाय प्रवेश घेण्याची मुभा

केंद्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (जेईई) न देताच आयआयटीमध्ये प्रवेश घेता येणार आहे. आयआयटी मुंबईत वर्षभरापूर्वी गणित विषयाची बीएस्सी पदवी सुरू करण्यात आली. यामध्ये जे विद्यार्थी गणित ऑलिम्पियाडमध्ये यशस्वी होतात त्यांना प्राधान्य दिले जाते. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना जेईई शिवाय आयआयटीला प्रवेश मिळणे शक्य होऊ  शकेल.