अनेक ठिकाणी मोबाइलसह मतदारांना प्रवेश बंदी;निवडणूक आयोगाच्या आदेशांबाबत संभ्रम

मुंबई : कुठेही जाताना सोबत मोबाइल बाळगणाऱ्या मुंबईकरांची आज मतदान केंद्रांवर मात्र चांगलीच पंचाईत झाली. मतदान केंद्रावर जाताना मोबाइल नेऊ नये असे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. या निर्णयामुळे आज जवळजवळ सर्वच मतदान केंद्रांवर गोंधळाची स्थिती होती. काही ठिकाणी मोबाइल घेऊन आलेल्या मतदारांना प्रवेश नाकारला जात होता, तर काही ठिकाणी मोबाइल बंद करून जाण्याची परवानगी दिली जात होती. त्यामुळे मोबाइल बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी मतदान केंद्रावर वेगवेगळ्या पद्धतीने होत होती.

मतदान करतानाच्या प्रक्रियेचे चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांवरून प्रसारित करण्याच्या घटनांनंतर मोबाइलबाबतच्या नियमांची कठोर अमलबजावणी करण्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सूचित केले होते. त्यामुळे या वेळी मतदान केंद्रांवर मोबाइल बंदी घालण्यात आली होती. अनेक ठिकाणी हा निर्णय काटेकोरपणे पाळण्यात आला, तर काही ठिकाणी त्याची ही अंमलबजावणी  शिथिल करण्यात आली होती. मतदान केंद्रात प्रवेश करतानाच पोलिसांमार्फतच या नियमाची अंमलबजावणी केली जात होती. काही ठिकाणी मतदार मोबाइल घेऊनच आत शिरत होते. मग पोलीस त्यांना अडवत होते. दोन-तीन जणांच्या घोळक्याने जे मतदार येत होते ते एकमेकांकडे मोबाइल देऊन मतदान करून येत होते. परंतु जे मतदार एकटेच येत होते अशा मतदारांना मात्र अडचणी येत होत्या. वेळात वेळ काढून आलेल्या मतदारावर परत जाण्याची वेळ येऊ नये म्हणून त्यांना मोबाइल बंद करून पर्समध्ये किंवा खिशात ठेवण्याची विनंती पोलीस करत होते.

सेल्फी पॉइंट आणि मोबाइल बंदी

एकीकडे मोबाइल बंदीच्या नियमाची कठोर अंमलबजावणी केली जात होती, मात्र मतदान केंद्राच्या आवारातच आकर्षक असे सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले होते. मतदान करून आल्यानंतर मतदार बोट उंचावून या सेल्फी पॉइंटजवळ उभे राहून छायाचित्र काढून घेत होते. नवमतदारांसाठी निवडणूक आयोगाने सेल्फी स्पर्धा आयोजित केली असून त्यात मतदान केंद्रा बाहेर काढलेला सेल्फी या स्पर्धेसाठी ग्राह्य़ धरला जाणार आहे. परंतु मतदान केंद्राच्या बाहेर असलेल्या सेल्फी पॉइंटवरच मतदार फॅमिली फोटो काढून घेत होते.