भाजप आणि शिवसेनेच्या विविध मंत्र्यांच्या विरोधात झालेले आरोप किंवा घोटाळ्यांची माहिती देणारी पुस्तिका काँग्रेसने तयार केली असून, सामान्य लोकांच्या माहितीसाठी या पुस्तिकेचे वितरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत १४ मंत्र्यांच्या विरोधात आरोप झाले, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साऱ्याच मंत्र्यांना अभय दिल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.

मंत्र्यांच्या घोटाळ्यांच्या पुस्तिकेचे प्रकाशन उद्या काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. पंकजा मुंडे (चिक्की घोटाळा), सुभाष देशमुख (शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेऊन रक्कम हडप करणे, वादग्रस्त बंगला, नोटाबंदीनंतर ९१ लाखांची रोकड जप्त होणे), प्रकाश मेहता (बिल्डरांच्या फायद्याचा निर्णय), विनोद तावडे (बोगस पदवी, शाळांसाठी खरेदी करण्यात आलेल्या अग्निशमन उपकरणांमध्ये घोटाळा), गिरीष बापट (तूरडाळ घोटाळा), विष्णू सावरा (आदिवासी विभागातील अनेक घोटाळे), जयकुमार रावळ (बँक कर्ज घोटाळा आणि पर्यटन मंडळाच्या जागेतील रिसॉर्ट), संभाजी निलंगेकर-पाटील (बँक कर्ज), सुभाष देसाई (उद्योग मंडळाची जागा परत करणे), डॉ. दीपक सावंत (औषध खरेदी), महादेव जानकर (लसींची खरेदी), अर्जुन खोतकर (तूर खरेदी), रवींद्र वायकर (वनविभाग जमीन बळकविणे). एवढय़ा मंत्र्यांवर आरोप होऊनही मुख्यमंत्र्यांनी विनाचौकशी या साऱ्या मंत्र्यांना अभय दिले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयात फक्त चहापानावर तीन कोटींपेक्षा जास्त खर्च झाला आहे. भाजप व शिवसेना सरकारच्या काळात सर्वत्र घोटाळे आणि भ्रष्टाचार झाले आहेत, असा आरोपही निरुपम यांनी केला.