विधानसभेतील चर्चेवेळी विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारवर टीका करणे हे नेहमीचेच दृश्य. मात्र गुरुवारी पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटय़ाल यांनी आमदारांची कामे व मराठवाडय़ासाठी वीजदर सवलत अनुदानावरून महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर देताना हे सरकार कोणा एकटय़ाची जहागिरी नव्हे अशी तिखट टीका केली.

पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी जालन्याचे आमदार कैलास गोरंटय़ाल यांनी विदर्भ-मराठवाडय़ासाठी असलेल्या औद्योगिक वीजदर सवलत अनुदानाचा विषय काढला. मागील भाजप सरकारने मराठवाडा-विदर्भातील उद्योगांसाठी वीजदर सवलत अनुदानापोटी १२०० कोटी रुपये दिल्याने उद्योगांना दिलासा मिळाला. पण महाविकास आघाडी सरकारने मात्र ते अनुदान बंद केले, अशी टीका गोरंटय़ाल यांनी केली. तसेच नगरविकास विभागात आमदारांची कामे होत नाहीत, पण माजी आमदारांनी दिलेल्या पत्रानुसार लगेच कामे होतात, अशी नाराजी व्यक्त करत हे सरकार कोणा एकटय़ाची जहागिरी नव्हे अशी तिखट टीका शिवसेनेला उद्देशून केली. तसेच पक्ष सत्तेवर येऊन काहीही उपयोग होत नसल्याची खंत व्यक्त करताना ‘मुनाफा तो छोडो लागत भी नहीं मिली’ असा शेर ऐकवताच विरोधी भाजपच्या सदस्यांनी बाके  वाजवून त्यांना दाद दिली.

महाविकास आघाडीचे समर्थन करणाऱ्या समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशीद व हिंदुत्वाबाबत केलेल्या विधानांबद्दल टीका केली. हे सरकार एकटय़ा शिवसेनेचे नाही तीन पक्षांचे आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली.