मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे पडल्याच्या कारणावरुन अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेसचे आमदार नितेश राणे पोलिसांसमोर शरण आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासह तिघांना अटक केली तसेच त्यांच्या इतर साथीदारांचा शोधही पोलीस घेत आहेत. अटकेच्या कारवाईनंतर त्यांना कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. तत्पूर्वी नितेश यांचे वडील खासदार नारायण राणे यांनी त्यांच्या कृतीवर नाराजी व्यक्त करीत माफी मागितली होती.
Dikshit Gedam, SP, Sindhudurg: Nitesh Rane and two of his supporters have been arrested and search for other accused is on. They will be produced in court tomorrow https://t.co/arlggBoprg
— ANI (@ANI) July 4, 2019
मुंबई गोवा महामार्गावर खड्डे पडल्याने आणि चिखल उडत असल्याने नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरच्या पुलाला बांधलं आणि त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या होत्या. या प्रकरणी कणवली पोलिसांनी नितेश राणे यांच्यासह त्यांच्या ४० ते ५० समर्थकांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, आमदार नितेश राणे यांचे वडील राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, ‘नितेश यांचं हे वागणं अत्यंत चुकीचं आहे. महामार्गाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणं योग्य आहे, पण त्याच्या समर्थकांनी अशा प्रकारे हिंसा करणं चुकीचं आहे. मी याला समर्थन देत नाही. मी त्याला माफी मागायला का सांगणार नाही, तो माझा मुलगा आहे. जर एखादा बाप स्वतःची चूक नसताना माफी मागू शकतो, तर मुलाला माफी मागावीच लागेल.’
नितेश राणे यांनी संतापलेल्या स्वरातच उप अभियंत्याला खड्ड्यांबद्दल जाब विचारला. लोकांच्या अंगावर चिखल उडतो तो तुम्हाला दिसत नाही का? रस्त्यावर पडलेले खड्डे तुम्हाला दिसत नाही का? चिखल उडाल्यावर कसं वाटतं तुम्हीच बघा असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचा चिखल ओतायचा आदेश दिला. त्यानंतर तातडीने दोन-चार कार्यकर्त्यांनी उप अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या डोक्यावर चिखलाने भरलेल्या बादल्या रिकाम्या केल्या.
प्रकाश शेडेकर यांना गडनदी पुलाला बांधूनही ठेवलं. सामान्य माणसांना जो त्रास सहन करावा लागतो तो आज तुम्हीपण करा असं म्हणत त्यांच्यावर चिखलफेक करण्यात आली. कणकवली तुंबवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? असाही प्रश्न नितेश राणेंनी विचारला. नितेश राणे आणि स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांनी गडनदी पूल ते जाणवली पूल इथवर पायी चालत नेलं आणि वस्तुस्थिती दाखवली. तसेच शेडेकर यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 4, 2019 7:07 pm