मधु कांबळे, मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर १९ आमदारांनी राजीनामे देऊन पक्षांतरे केली आहेत. राजीनामे देऊन पक्षांतरे करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्या खालोखाल काँग्रेसचा क्रमांक आहे. तर शिवसेनेपेक्षा भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदारांची संख्या अधिक आहे.

आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० आमदारांनी राजीनामे देऊन भाजप वा शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यात विधानसभेच्या ९ व विधान परिषदेच्या एका आमदाराचा समावेश आहे.  काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ७ आमदारांनी राजीनामे देऊन भाजप वा शिवसेनेची वाट धरली आहे. त्यात विधानसभेच्या ६ व विधान परिषदेच्या एका आमदाराचा समावेश आहे. भाजपचे एकमेव आमदार डॉ. आशीष देशमुख आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये दाखल झाले. तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरेश धानोरकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हणत काँग्रेसमध्ये प्रवेश केला व अटीतटीच्या लढतीत त्यांनी विजय मिळविला.

राष्ट्रवादीमधून आमदारकीचे राजीनामे देऊन भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या आमदारांमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागर, दिलीप सोपल, राणा जगजितसिंग पाटील आदी नेत्यांचा समावेश आहे.

कोण, कुठे गेले ..

’ राधाकृष्ण विखे-पाटील,  काँग्रेस-भाजप

’ कालिदास कोळंबकर, काँग्रेस-भाजप

’ निर्मला गावित, काँग्रेस-भाजप

’ जयकुमार गोरे, काँग्रेस-भाजप

’ भाऊसाहेब कांबळे, काँग्रेस-शिवसेना

अब्दुल सत्तार, काँग्रेस-शिवसेना

’ जयदत्त क्षीरसागर, राष्ट्रवादी-शिवसेना

’ पांडुरंग बरोरा, राष्ट्रवादी-शिवसेना

’ शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादी-भाजप

’ संदीप नाईक, राष्ट्रवादी-भाजप

’ वैभव पिचड, राष्ट्रवादी-भाजप

’ दिलीप सोपल, राष्ट्रवादी-शिवसेना

’ राणा रणजितसिंग पाटील, राष्ट्रवादी-भाजप

’ अवधूत तटकरे, राष्ट्रवादी-शिवसेना

’ निरंजन डावखरे, राष्ट्रवादी-भाजप

’ डॉ. आशीष देशमुख, भाजप-काँग्रेस

’ सुरेश धानोरकर, शिवसेना-काँग्रेस