मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास केंद्रातील भाजपचे सरकार जबाबदार असल्याच्या निषेधार्थ शनिवारी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, कार्याध्यक्ष कु णाल पाटील आदी नेते वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाले होते.

मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून मोदी सरकारचा निषेध केला. केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले, परंतु तेच लोक आंदोलन करीत आहे, अशी टीका हंडोरे यांनी के ली. नांदेड येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पुण्यात प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली, तर धुळे येथे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, अकोला, चंद्रपूर, अमरावती, नवी मुंबईसह सर्व जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले.

पदोन्नतीतील आरक्षणासाठी मोर्चा

महाराष्ट्र आरक्षण हक्क कृती समितीचे एस.के .भंडारे, हरिभाऊ राठोड, आत्माराम माखरे, डॉ. संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत, तर महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे सहसचिव डॉ. बबन जोगदंड, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे संजय घोडके, पांडुरंग शेलार यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे पदोन्नतीतील आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.