अंतिम निर्णय मायावती घेणार

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप-शिवसेनेचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी उभारण्याचे प्रयत्न काँग्रेसने सुरू केले आहेत. राज्यात विशेषत विदर्भ, मराठवाडय़ात निवडणूक निकाल फिरविण्याची ताकद असलेल्या बहुजन समाज पक्षालाही महाआघाडीत सहभागी करून घेण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. अर्थात राज्यात युती करायची की नाही, याचा अंतिम निर्णय बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांचाच असणार आहे. त्याबाबतची चर्चा दिल्लीस्तरावर होऊ शकते, असे सांगण्यात आले.

या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना विचारले असता, २४ सप्टेंबरला दिल्लीत होणाऱ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत विविध राज्यांतील आघाडय़ांबाबत आढावा घेतला जाणार आहे. त्यात बसपबरोबर युती करण्याबाबतही चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदेश बसपचे अध्यक्ष सुरेश साखरे यांच्याशी संपर्क साधला असता, राज्यात काँग्रेसबरोबर युती करायला काही अडचण नाही, परंतु त्याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाच्या प्रमुख मायावती घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही प्रकारे भाजप-शिवसेनेच्या विरोधातील मतांमध्ये फूट पडू द्यायची नाही, अशी रणनीती काँग्रेसने आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे राज्यात समविचारी पक्षांना बरोबर घेऊन आघाडी करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख विरोधी पक्षांनी आघाडी करण्याचे ठरविले आहे. अन्य धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांनाही सोबत घेण्यात येणार आहे. त्यानुसार या पक्षांच्या नेत्यांबरोबर चर्चा सुरू करण्यात आली आहे.

 युतीचा आग्रह

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसपला अद्याप यश मिळालेले नाही; परंतु त्या पक्षाला मिळालेल्या मतांमुळे अनेक मतदारसंघांतील निवडणूक निकाल बदलले आहेत. त्यामुळे बसपला सोबत घेणे काँग्रेसला गरजेचे वाटते. खासकरून बसपबरोबर युती करावी, असा विदर्भातील काँग्रेस नेत्यांचा आग्रह असल्याचे सांगण्यात येते.